वैशाली झनकरांकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 01:45 IST2021-08-13T01:44:59+5:302021-08-13T01:45:57+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणारी अटक टाळण्यासाठी अखेर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या संशयित लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांच्या वतीने वकिलांकडून जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी (दि. १२) दाखल केला गेला.

वैशाली झनकरांकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणारी अटक टाळण्यासाठी अखेर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या संशयित लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांच्या वतीने वकिलांकडून जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी (दि. १२) दाखल केला गेला.
आठ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या सापळ्यात अडकलेल्या वैशाली झनकर-वीर चौकशीनंतर बुधवारी सकाळपासून शहरातून पसार झाल्या. सापळा पथकाच्या डोळ्यांत धूळफेक करत शहरातून त्या सहजासहजी निसटल्या. यामुळे ठाणे एसीबीचे सापळा पथक चांगलेच गोंधळले. दरम्यान, शुक्रवारपर्यंत फरार संशयित वीर यांना अटक करण्यास यशस्वी होऊ, अशा विश्वास तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे यांनी व्यक्त केला आहे. आमचे पथक वीर यांचा शोध घेत असून, त्यांची हमी घेणारे दीर आणि भावजयीदेखील फरार असून, त्यांचीही माहिती घेतली जात असल्याचे ढगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, चौकशीदरम्यान वैशाली वीर यांचा मोबाइल ठाणे सापळा पथकाने जप्त केला असून, सध्या त्यांच्याकडे मोबाइल नसल्याने त्यांचे ‘लोकेशन’ शोधण्यासही पोलिसांना अडचणीचे होत आहे.
दरम्यान, वैशाली वीर यांच्या वतीने ॲड. अविनाश भिडे यांनी गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर शुक्रवारी (दि. १२) दुपारी सुनावणी होणार आहे. न्यायालयाकडून अर्ज मंजूर केला जातो की फेटाळला जातो याकडे आता सर्व जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.