रोहयोची कामे सुरू करण्याचे आवाहन
By Admin | Updated: August 30, 2015 21:57 IST2015-08-30T21:42:22+5:302015-08-30T21:57:48+5:30
रोहयोची कामे सुरू करण्याचे आवाहन

रोहयोची कामे सुरू करण्याचे आवाहन
वडेल : मालेगाव तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमीतून विविध कामे सुरू करुन मजूर वर्गाला रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.
येथे तालुक्याच्या दुष्काळी परिस्थितीचा दौरा व समस्यांच्या निराकरणासाठी ते आले होते. यावेळी ग्रामस्थांतर्फे त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गावातील पाणीपुरवठ्यासाठी नवीन विहीर खोदकामासह जीर्ण झालेल्या विद्युत तारा बदलणे, खाकुर्डी रस्त्याची दुरुस्ती करणे आदि समस्या राज्यमंत्र्यांपुढे आल्या.
यावेळी भुसे यांनी सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता पिण्याच्या पाण्यासाठी नवीन विहीर गरजेची असून त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पुढाकार घेऊन त्याचा पाठपुरावा करावा त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सांगितले. याशिवाय येत्या काही महिन्यात नजर आणेवारी करण्यात येणार असून पिकासोबतच शेतकऱ्यांनी चाऱ्याचेही नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी भुसे यांचेसह उपसरपंच नरेंद्र सोनवणे, डॉ. यशवंत सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन नाना सावळे यांनी केले तर प्रास्ताविक ग्रा.पं. सदस्य अरुण बोरसे यांनी केले. राजेंद्र शेलार यांनी आभार मानले. (वार्ताहर)