जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कळवण तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
By Admin | Updated: August 9, 2016 22:20 IST2016-08-09T22:19:37+5:302016-08-09T22:20:06+5:30
रस्त्यांची अवस्था दयनीय !

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कळवण तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
कळवण : तालुक्यातील आदिवासी, दुर्गम व अतिदुर्गम भागात जुलै महिन्यात व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात ५०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने नदी-नाल्यांवरील पूल तुटले आहेत. फरशीपूल वाहून गेल्याने लगत असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासकीय मदत तत्काळ द्यावी व तालुक्यातील रस्त्यांची दुरु स्ती करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे.
दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ यांसारख्या अस्मानी संकटांमुळे शेतकऱ्यांची पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून सरकारने शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे व शेतपिकांचे तसेच पूल तुटल्याने व रस्ते वाहून गेल्याने लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
गिरणा, पुनंद, बेहडी, तांबडी, धनोली आदि नद्या ठिकठिकाणी असलेल्या नाल्यांना पूर आल्याने विहिरींचेदेखील नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटार, इलेक्ट्रिक साहित्य वाहून गेले असल्याची तक्रार सौ. पवार यांनी निवेदनात करून निवेदनाकडे लक्ष वेधले आहे. कळवण तालुक्यात घराच्या पडझडीच्या वीस घटना घडल्या असून, जीवितहानी झाली नसून दह्याणे, हिंगवे, भांडणे, बोरदैवत, मोहमुख, आंबुर्डी, करंभेळ, दळवट, भौती, पुनंदनगर, मानूर, नांदुरी, जिरवाडे आदि ठिकाणी तालुक्यात २० घरांची पडझड झाली आहे. भौती ते उंबरदे रस्त्यावरील पुनंद नदीवरील सुमारे ३० फूट पूल वाहून गेला असून, संपर्क तुटला आहे. तताणी-शेपूपाडा रस्त्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूंचे भराव वाहून गेले. (वार्ताहर)
सप्तशृंगगड-नांदुरी रस्ता पावसामुळे ढासळल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ते उखडून गेले असून बोरदैवत ते देवळी रस्त्यावरील फरशी उखडली असल्याने रस्ता बंद झाला आहे. ओतूर-कुंडाणे वस्तीकडे जाणारा रस्ता, बार्डे-दह्याणे गावाला जोडणारा पूल खचला असून शाळकरी मुले व ग्रामस्थ भयभयीत झाले आहेत. अशा एक ना अनेक रस्त्यांच्या तक्र ारी प्राप्त होत असून तालुक्यातील रस्ते, पूल, नाले, फरशी यांची पाहणी करून नुकसानीचा अहवाल शासनदरबारी सादर करून रस्त्याची शासनाने दुरु स्ती करून तालुक्यातील जनतेला दळणवळणासाठी रस्ते सुरक्षित व सुरळीत करून द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी केली आहे.
कळवण तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आणि बिकट झाली असून कळवण या १०० टक्के आदिवासी असलेल्या तालुक्यात रस्त्यांची सुबत्ताही टिकून होती; पण गेल्या दोन वर्षांपासून ही सुबत्ता लयास गेली आहे , कळवण तालुक्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्ते मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी उद्ध्वस्त झाले असून जागोजागी खड्डे पडल्याने दुरु स्ती करण्याची गरज बनली आहे. कळवण तालुक्यात राज्यमार्ग १२५ कि मी. लांबीचा असून प्रमुख जिल्हा मार्ग ८० किमी. लांबीचा आहे. या राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्ते मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी उद्ध्वस्त झाले असून जागोजागी खड्डे पडले असल्याने खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून प्रवास करण्याची वेळ आज जनतेवर येऊन ठेपली असल्याने या रस्त्यांची दुरु स्ती करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे.
चणकापूर धरणाचा जलसाठा या पुलापर्यंत असून येथील पाण्याची पातळी अतिशय खोल आहे. त्यामुळे दुर्दैवाने पुलामुळे एखादी अलिखित घटना घडली, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित विभागाच्या यंत्रणेने तत्काळ लक्ष द्यावे, याकडे आदिवासी बांधवांनी लक्ष वेधले आहे. आठ दिवसांपासून या रस्त्यावरून एस. टी. महामंडळाच्या बसेस बंद केल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच अभोणा -बोरगाव रस्त्यावरील भिलजाई येथील लहान पुलाचा भराव पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे, मोहपाडा ते वडाळे या पुलाची परिस्थितीदेखील यापेक्षा वेगळी नाही.
दरम्यान, पुलाच्या दुरवस्थेबाबत सोशल मीडियावरील चर्चेकडे लक्ष वेधून अभोणा पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमनाथ सोनवणे, कृउबा संचालक डी. एम. गायकवाड, सुधाकर सोनवणे, दीपक सोनजे, राजू पाटील या अभोणा येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देसगाव पुलावर समक्ष जाऊन पाहणी केली असता त्यावेळी पुलाची दयनीय परिस्थिती समोर आली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्याशी चर्चा करून लक्ष वेधले व आदिवासी बांधवांना दिलासा दिला, तर पुलाची परिस्थिती व घटनास्थळाबाबत अभोणा पोलीस स्टेशनने संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून लक्ष वेधले.
यावेळी देसगाव, बेंदीपाडा येथील माजी सरपंच भिवराज बागुल, फुलदास बागुल, मनोहर बागुल, लक्ष्मण बागुल, गंगाधर बागुल, बाळू बागुल, देवीदास बागुल आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.