इगतपुरी वगळता सर्वत्र गोडसेंचाच बोलबोला मताधिक्य : पश्चिममध्ये ५६ हजार, सिन्नरमध्ये ४१ हजारांची आघाडी
By Admin | Updated: May 17, 2014 00:18 IST2014-05-17T00:01:36+5:302014-05-17T00:18:48+5:30
नाशिक : सिन्नरला गोडसेंना मताधिक्य मिळणार, परंतु इगतपुरी आणि मध्य नाशिकमध्ये मतदारांचा कौल छगन भुजबळ यांनाच मिळेल, असे अनेक दावे-प्रतिदावे केले गेले. प्रत्यक्षात इगतपुरीत भुजबळ यांनी गोडसे यांच्यावर अवघ्या दीड हजार मतांची आघाडी घेतली. अन्य विधानसभा मतदारसंघात हेमंत गोडसे यांचाच बोलबाला राहिला. मध्य नाशिकच्या मताधिक्यावर भुजबळ यांना भरवसा होता. परंतु तेथेही गोडसे हेच आघाडीवर राहिले. गोडसे यांना पश्चिम नाशिकने सर्वाधिक ५६ हजार ७५८ मतांची विक्रमी आघाडी दिली.

इगतपुरी वगळता सर्वत्र गोडसेंचाच बोलबोला मताधिक्य : पश्चिममध्ये ५६ हजार, सिन्नरमध्ये ४१ हजारांची आघाडी
नाशिक : सिन्नरला गोडसेंना मताधिक्य मिळणार, परंतु इगतपुरी आणि मध्य नाशिकमध्ये मतदारांचा कौल छगन भुजबळ यांनाच मिळेल, असे अनेक दावे-प्रतिदावे केले गेले. प्रत्यक्षात इगतपुरीत भुजबळ यांनी गोडसे यांच्यावर अवघ्या दीड हजार मतांची आघाडी घेतली. अन्य विधानसभा मतदारसंघात हेमंत गोडसे यांचाच बोलबाला राहिला. मध्य नाशिकच्या मताधिक्यावर भुजबळ यांना भरवसा होता. परंतु तेथेही गोडसे हेच आघाडीवर राहिले. गोडसे यांना पश्चिम नाशिकने सर्वाधिक ५६ हजार ७५८ मतांची विक्रमी आघाडी दिली.
नाशिक लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यात अटीतटीची लढत मानली जात होती. त्यामुळे मतदानानंतर आडाखे बांधताना उमेदवारांना कुठे आघाडी मिळेल आणि कोठे पिछाडी मिळेल, याविषयी दावे केले जात होते. देवळाली आणि सिन्नर मतदारसंघात गोडसे यांना मताधिक्य मिळेल. परंतु इगतपुरी आणि मध्य नाशिकमध्ये ही उणीव भुजबळ भरून काढतील, अशी गणिते मांडली जात होती. पूर्व नाशिक म्हणजेच पंचवटीमध्येही भुजबळ हेच आघाडीवर राहातील, असे सांगितले जात होते. परंतु मतदान यंत्रांनी भुजबळ यांच्या बाबतीत सारेच दावे फोल ठरविले.
इगतपुरी मतदारसंघात भुजबळ यांचा भ्रमनिरास झाला. त्यांना ६० हजार ७४२ मते मिळाली, तर हेमंत गोडसे यांना ५८ हजार ९९९ मते मिळाली. त्यामुळे भुजबळ यांना केवळ एक हजार ७४३ मताधिक्य राहिले. मध्य नाशिकमध्ये तर जुन्या नाशिकसह अन्य भागांवर भुजबळ यांची मदार होती. परंतु या मतदारसंघातही गोडसे हेच आघाडीवर राहिले. या मतदारसंघात गोडसे यांना ७२ हजार ६२३ मते मिळाली, तर भुजबळ यांना ५७ हजार ४२० मते मिळाली. म्हणजे गोडसे यांनाच १५ हजार २०३ मतांचे मताधिक्य मिळाले. सिन्नरमध्ये गोडसे हेच आघाडीवर असतील अशी अटकळ होती. ते खरे झाले. सिन्नर मतदारसंघात गोडसे यांना ९४ हजार ९१३ मते मिळाली तर भुजबळ यांना ५३ हजार १४८ मते मिळाली. म्हणजेच ४१ हजार ७६५ मतांची आघाडी गोडसे यांना मिळाली.
विधानसभा मतदारसंघनिहाय गोडसे यांचे मताधिक्य
नाशिक पूर्व- ४२ हजार ४२०, नाशिक पश्चिम- ५६ हजार ७५८, नाशिक मध्य- १५ हजार २०३, सिन्नर- ४१ हजार ७६५, देवळाली- ३२ हजार २७६.