वाढत्या रुग्णसंख्येमुळे मालेगाववासीयांत चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 00:40 IST2021-03-15T21:19:54+5:302021-03-16T00:40:35+5:30
मालेगाव : शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे मालेगावकरांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे मालेगाववासीयांत चिंता
महापालिका प्रशासनाने सहारा, सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणे सुरू केले आहे. नागरिकांचा बेजबाबदारपणा व सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे दिवसेंदिवस कोरोनाची रूग्ण संख्या वाढत आहे. दोन दिवसांपासून दररोज रुग्ण संख्या शंभरी पार करीत आहे. सद्य:स्थितीत शहरात ९३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.रुग्ण संख्येची वाटचाल हजारी पार करण्याकडे होत आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या होम आयसोलेशन (गृहविलगीकरण) ५०३, सहारा रुग्णालयाच्या दोघा युनिटमध्ये ७२, सामान्य रुग्णालयात २२ व शहरातील खासगी रुग्णालयात १२४ रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारीही शंभर रुग्णांची भर पडली आहे. महापालिकेकडून कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. शहरातील १७ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. ४५ ते ६० वय असलेल्या नागरिकांनी महापालिकेने उभारलेल्या १४ नागरी आरोग्य केंद्रांवर व ३ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. ३० एप्रिलपर्यंत नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी केले आहे.