अग्निशमन प्रमुखाची आणखी एक चौकशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:15 IST2018-05-13T00:15:16+5:302018-05-13T00:15:16+5:30
शासनाचे परिपत्रक दडवून ठेवल्याप्रकरणी एक लाख रुपयांचा दंड ठोठावलेल्या नाशिक महापालिकेतील अग्निशमन प्रमुख अनिल महाजन यांच्याविरुद्ध प्रशासनाने आणखी एक चौकशी प्रस्तावित केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महाजन यांचा सेवानिवृत्तीचा काळ जसा जवळ येत चालला आहे, तसे ते चौकशांच्या फेऱ्यात अडकत चालले आहेत.

अग्निशमन प्रमुखाची आणखी एक चौकशी?
नाशिक : शासनाचे परिपत्रक दडवून ठेवल्याप्रकरणी एक लाख रुपयांचा दंड ठोठावलेल्या नाशिक महापालिकेतील अग्निशमन प्रमुख अनिल महाजन यांच्याविरुद्ध प्रशासनाने आणखी एक चौकशी प्रस्तावित केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महाजन यांचा सेवानिवृत्तीचा काळ जसा जवळ येत चालला आहे, तसे ते चौकशांच्या फेऱ्यात अडकत चालले आहेत. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेचे अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन यांच्याविरुद्ध आणखी काही आरोप निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी चौकशी लावण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने, सन २०१० ते २०१८ या कालावधीत पूर्वपरवानगीचे १३६८ ना हरकत दाखले महाजन यांनी दिले परंतु, नगररचना विभागाच्या माहितीनुसार ती संख्या ११३४ इतकी आहे. महाजन यांना काही दिवसांपूर्वीच शासनाचे ३० आॅक्टोबर २०१४ चे परिपत्रक दडवून ठेवल्याप्रकरणी प्रशासनाने एक लाख रुपयांचा दंड केलेला आहे.
विभागीय चौकशी प्रस्तावित
दोन्ही विभागाच्या माहितीत तफावत निदर्शनास येते. याशिवाय, मुख्यालयातील अग्निशमन सेवेबाबत बेफिकीर असणे, बिटको हॉस्पिटलमधील यंत्रणा बसविण्यास मुदतवाढ देताना महाजन यांनी दिलेल्या अभिप्रायात असलेली अनियमितता यासह अन्य कारणास्तव महाजन यांची विभागीय चौकशी प्रस्तावित असून, त्यासंबंधीची फाईल आयुक्तांसमोर गेल्याचे सांगण्यात आले.