बचत गटांच्या वादातून अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST2021-07-27T04:15:27+5:302021-07-27T04:15:27+5:30
नाशिक : काेरोना काळात मुलांचे कुपोषण होऊ नये, यासाठी शासनाने अशा घटकांतील मुलांना घरपोच धान्य देण्याचा निर्णय घेतला आणि ...

बचत गटांच्या वादातून अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार बंद
नाशिक : काेरोना काळात मुलांचे कुपोषण होऊ नये, यासाठी शासनाने अशा घटकांतील मुलांना घरपोच धान्य देण्याचा निर्णय घेतला आणि एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत तो आजतागायत सुरू आहे. मात्र, नाशिक शहरातील अंगणवाड्यांमध्ये महापालिकेने गेल्या दीड वर्षात केवळ दोन वेळा पोषण आहाराअंतर्गत मुलांना फळे आणि बिस्किटांचा खाऊ पुरवला आहे. त्यानंतर आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आले तरी पोषण आहारच देण्यात आलेला नाही. त्यामुळे सुमारे वर्षभर मुले पोेषण आहारापासून वंचित आहेत. बचत गटांना कामे देण्यावरून असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिक महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या ३७२ अंगणवाड्या आहेत. याशिवाय राज्य शासनाच्या एकात्मिक बाल विकासअंतर्गतदेखील अंगणवाड्या चालवल्या जातात. मात्र, त्यात शासकीय नियमांचे पालन करून प्रत्येक नियमाची अंमलबजावणी केली जाते. नाशिक महापालिका स्वायत्त असल्याने अनेक निर्णय ही संस्थाच घेत असते. तरीही मुलांना वर्षभरापासून पोषण आहारापासून वंचित राहावे लागले आहे. विशेष म्हणजे शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या एकूण जमा अंदाजपत्रकाच्या पाच टक्के रक्कम महिला आणि बालकल्याण विभागासाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. मात्र, त्यानंतरही केवळ पोषण आहारासाठी बचत गट ठरवण्याच्या वादातून मुलांची आबाळ होत असल्याचे समजते.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आले आणि २३ मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर वंचित घटकांच्या अनेक समस्या हळूहळू समोर येऊ लागल्या. दुर्गम आणि आदिवासी भागातील मुलांना पोषण आहार मिळत नसल्याने त्यांचे कुपोषण वाढण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे हा प्रश्न चर्चिला जाताच शासनाने घरपोच पोषण आहार देण्याचे आदेश दिले. त्यानुसार एकात्मिक बाल विकासअंतर्गत घरपोच पोषण आहार देण्यात आला. नाशिक महापालिकेने मुलांना घरपोच खाऊ पाठवला. यात फळे, चिक्की, बिस्किटे असा आहार होता. मात्र, महापालिकेने हा खाऊ दोन महिन्यांपूुरताच दिला. नंतर मात्र पोषण आहार बंद आहे.
नाशिक महापालिकेच्या वतीने आता अंगणवाडी सेविकांच्या मार्फत सर्वेक्षण सुरू असून, त्यात आता किती मुले लाभार्थी ठरू शकतील, याची माहिती संकलित केली जात आहे, अशी माहिती उपआयुक्त अर्चना तांबे यांनी दिली. त्यामुळे महापालिका पोषण आहाराबाबत किती गंभीर आहे, हेच स्पष्ट झाले आहे.
इन्फो...
दृष्टिक्षेपात महापालिका
एकूण अंगणवाड्या ३७२
सेविकांची संख्या ७२०
मुलांची संख्या १,७००
इन्फो...
एकात्मिक बाल विकास विभागाच्या वतीने शहरी भागात नाशिक महापालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात अंगणवाड्या चालवल्या जातात. यात प्रोजेक्ट एकमध्ये १४०, तर प्रोजेक्ट २मध्ये शंभर अंगणवाड्या आहेत. यातील काही अंगणवाड्या त्र्यंबकेश्वर, सिन्नर, इगतपुरी, मनमाड, भगूर या भागात आहेत. मात्र, शासनाच्या आदेशाप्रमाणे याठिकाणी कुटुंबीयांना पोषण आहार दिले जात आहे. २५ किलो धान्य एका महिन्यासाठी असे दोन महिन्यांचे पन्नास किलो एकाच वेळी देण्यात येत आहे.
कोट..
नाशिक महापालिकेने कोरोना काळात दोन महिने मुलांना खाऊ घरपोच दिला आहे. आता नव्याने मुलांचे सर्वेक्षण सुरू असून, ते पूर्ण होताच मुलांना पोषण आहार दिला जाईल.
- अर्चना तांबे, उपआयुक्त महापालिका
इन्फो...
महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीत सध्या पोषण आहार ठरवण्यावरून वाद सुरू असून, या वादामुळेच पोषण आहार रखडल्याचे वृत्त आहे. महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती स्वाती भामरे यांनी प्रस्थापित बचत गटांऐवजी नवीन बचत गटांना काम मिळावे. त्यामुळे गुणवत्तेत सुधारणा होईल, अशी भूमिका घेतल्याने अगोदरच्या बचत गटांना प्रशासनाला काम देता येत नसल्याने हा गाेंधळ निर्माण झाल्याचे समजते.