...अन् मृत्यूच्या दाढेतून ती परतली ! गर्भवतीला जीवदान :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 21:55 IST2017-07-18T21:55:50+5:302017-07-18T21:55:50+5:30

महापालिकेचे बिटको रुग्णालय सातत्याने विविध तक्रारींनी चर्चेत राहत आले आहे

... and she returned from death! Life expectancy: | ...अन् मृत्यूच्या दाढेतून ती परतली ! गर्भवतीला जीवदान :

...अन् मृत्यूच्या दाढेतून ती परतली ! गर्भवतीला जीवदान :

नाशिक : महापालिकेचे बिटको रुग्णालय सातत्याने विविध तक्रारींनी चर्चेत राहत आले आहे. मात्र, मंगळवारी (दि.१८) या रुग्णालयातील डॉक्टरांनी सुखद धक्का दिला. हिमोग्लोबीन १.१, प्लेटलेट्सचे प्रमाण १८०० च्या आसपास आणि गर्भाशय फाटलेले अशा अतिशय गुंतागुंतीच्या स्थितीत आणि मरणाच्या दारात उभ्या असलेल्या गर्भवती महिलेवर तातडीने उपचार करत डॉक्टरांच्या टीमने तिला अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परत आणले. सदर महिलेला कन्यारत्न प्राप्त झाले असून, माता-मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी दिली.
महापालिकेच्या बिटको रुग्णालयात सकाळी ११.४५ वाजता संसरी गावातील २८ वर्षीय ज्योती सुनील परदेशी या गर्भवती महिलेला अतिशय नाजूक प्रकृती बनलेली असताना उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर महिला रुग्णालयात दाखल झाली त्यावेळी तिचे गर्भाशय फाटलेले होते. भरपूर रक्तस्त्राव सुरू होता. हिमोग्लोबीनही १.१ होता आणि प्लेटलेट्सचे प्रमाण १८०० च्या आसपास होते. सदर महिलेवर महापालिकेतील निवासी डॉक्टर जयंत फुलकर, डॉ. सदानंद नायक, डॉ. दिलीप गरुड, डॉ. प्रज्ञा पाटील, डॉ. स्वप्नील राऊत, डॉ. शिल्पा काळे, परिचारिका स्वाती देवरे, रोहिता कुबेर यांनी तातडीने उपचार सुरू केले. महिलेला तीन बाटल्या रक्त देण्यात आले आणि १२.४५ वाजता नॉर्मल प्रसूती होत महिलेने कन्येला जन्म दिला. अतिशय गुंतागुंतीची स्थिती बनली असताना डॉक्टरांनी शर्थीने प्रयत्न करत महिलेला अक्षरश: मृत्यूच्या दारातून परत आणले. नवजात बाळासह महिलेची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉ. डेकाटे यांनी दिली.

Web Title: ... and she returned from death! Life expectancy:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.