...अन् रेल्वेस्थानकावर उडाली धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:24 IST2020-01-22T23:27:35+5:302020-01-23T00:24:32+5:30
रेल्वे प्रवासी, रेल्वे कर्मचारी आदींवर आलेल्या आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे याची प्रात्यक्षिके नाशिकरोड रेल्वेस्थानकात मंगळवारी (दि. २१) सायंकाळी उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद येथील नागरी सुरक्षा दलातर्फे करण्यात आली. रेल्वेस्थानकातील दहशतवादी हल्ला, आग, अपघात आदींप्रसंगी जखमी झालेल्या प्रवाशांची सुटका, आग विझवून जखमींचा बचाव करणे आदी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक सादर करताना अधिकारी व कर्मचारी.
नाशिकरोड : रेल्वे प्रवासी, रेल्वे कर्मचारी आदींवर आलेल्या आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे याची प्रात्यक्षिके नाशिकरोड रेल्वेस्थानकात मंगळवारी (दि. २१) सायंकाळी उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद येथील नागरी सुरक्षा दलातर्फे करण्यात आली. रेल्वेस्थानकातील दहशतवादी हल्ला, आग, अपघात आदींप्रसंगी जखमी झालेल्या प्रवाशांची सुटका, आग विझवून जखमींचा बचाव करणे आदी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
मुरादाबाद येथील रेल्वेच्या नागरी दलाचे प्रमुख एस. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रात्यक्षिकांत रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, रेल्वेचे अभियांत्रिकी, आरोग्य, विद्युत, अकौन्ट्स आदी विभागांचे सुमारे साठ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. बचाव पथकाचे प्रमुख सिंग, प्रथमोपचारचे विनोद भट, अग्निशमन दलाचे एस. मंडल, स्टेशनमास्तर आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा आदींच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रात्यक्षिके करण्यात आली. रेल्वेस्थानक अथवा रेल्वे प्रवासात कोणत्याही क्षणी दुर्घटना होऊ शकते, अपघात होऊ शकतात. त्याप्रसंगी मदतीची रंगीत तालीम घेण्यासाठी चार दिवसांपूर्वी मुरादाबादहून नागरी सुरक्षा दलाचे पथक नाशिकरोड स्थानकात आले होते. पहिल्या दिवशी त्यांनी आपत्तीची संभाव्य ठिकाणे शोधली. दुसऱ्या दिवशी निरीक्षण व सराव केला. तर तिसºया दिवशी मंगळवारी सायंकाळी प्रात्यक्षिकांमध्ये रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी असलेल्या महत्त्वाच्या भागात अडकलेल्या जखमी प्रवाशांची सुटका, मदत करण्यात आली. आगीत इमारतीत अडकलेल्या नागरिकांना दोरखंडाच्या सहाय्याने सुखरूप उतरविण्यात आले. ज्वालाग्रही पदार्थामुळे लागलेली आग विझविण्यात आली. प्रात्यक्षिके बघण्यासाठी प्रवासी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, स्थानिक नागरिक, विक्रेते आदींची मोठी गर्दी झाली होती.