आनंदवलीत वृध्दाची गळा चिरून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:27 IST2021-02-18T04:27:33+5:302021-02-18T04:27:33+5:30

गंगापूररोडवरील आनंदवली गावाच्या शिवारात राहणारे रमेश वाळुजी मंडलिक (७५) या वृध्दाचा अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने गळा चिरून ठार मारल्याची ...

Anandavali old man strangled to death | आनंदवलीत वृध्दाची गळा चिरून हत्या

आनंदवलीत वृध्दाची गळा चिरून हत्या

गंगापूररोडवरील आनंदवली गावाच्या शिवारात राहणारे रमेश वाळुजी मंडलिक (७५) या वृध्दाचा अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने गळा चिरून ठार मारल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ श्वान पथकासह न्यायसहायक प्रयोगशाळेच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मंडलिक यांच्या मारेकऱ्यांच्या शोधात त्वरित गंगापूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाेध पथकासह गुन्हे शाखेच्या पथकाला रवाना करण्यात आले. जमिनीच्या वादातून मंडलिक यांना ठार मारल्याचा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी वर्तविला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या दीड महिन्यांत गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील हा दुसरा खून तर शहरात घडलेली खुनाची आठवी घटना आहे.

---इन्फो--

...जणू खुनाची मालिकाच सुरू

शहरात खुनाची पहिली घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. यानंतर मुंबईनाका, गंगापूर, सरकारवाडा, भद्रकाली, अंबड, नाशिकरोड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सलग खुनाच्या घटना घडल्या. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत दीड महिन्यांत हा दुसरा खून आहे. यापूर्वीही आनंदवली शिवारात मद्यपी मित्रांमध्ये वाद होऊन एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्यात दगड टाकून त्यास जागीच ठार केले होते. यानंतर या वृध्दाचा खून करण्यात आला.

Web Title: Anandavali old man strangled to death