साठवणूक केलेल्या कांद्यालाही बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST2021-06-01T04:11:43+5:302021-06-01T04:11:43+5:30

उमराणे : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्हाळी कांद्यास आगामी काळात चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला ...

Also interfere with stored onions | साठवणूक केलेल्या कांद्यालाही बाधा

साठवणूक केलेल्या कांद्यालाही बाधा

उमराणे : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्हाळी कांद्यास आगामी काळात चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागल्याने, मिळेल त्या भावात कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे येथील स्व. निवृत्ती देवरे काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांमध्येही अशाच प्रकारची परिस्थिती आहे.

चाळीतील कांदा लवकर खराब होऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कसमादे पट्ट्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्हाळी कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना चालूवर्षी बियाणे मिळविण्यापासून ते रोपे टाकण्यापर्यंत तसेच लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध संकटांना तोंड देण्याची वेळ आली आहे. उन्हाळी कांदा लागवडीसाठी सुरुवातीस बहुतांशी शेतकऱ्यांजवळ घरगुती बियाणे असल्याने लवकर रोपे तयार व्हावीत, यासाठी लवकर बियाणे पेरणी केली होती; मात्र त्यावेळेस सततच्या पावसामुळे ही रोपे उगण्याआधीच खराब झाली होती. परिणामी, दुसऱ्यांदा रोपे तयार करण्यासाठी घरगुती बियाणे शिल्लक नसल्याने बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचे बियाणे मिळेल त्या भावात खरेदी करून पुन्हा रोपे तयार केली होती; परंतु बहुतांश कंपनींचे बियाणे खराब निघाल्याने उगवण क्षमतेवर परिणाम होऊन लागवडीवर याचा विपरित परिणाम झाला होता. या परिस्थितीवर मात करत कशाबशा लागवडी पूर्ण केल्या; मात्र उन्हाळी कांदे म्हणून लागवड केलेले बहुतांशी कांदे लाल निघाल्याने उन्हाळी कांद्यांचे क्षेत्र आपसूकच कमी झाले. त्यानंतर उर्वरित उन्हाळी कांदा पीक जोमात असतानाच गेल्या दोन महिन्यांपूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. या संकटातून काही अंशी वाचलेल्या कांद्यांचे उत्पादन तरी पदरात पडेल, अशी अपेक्षा असतानाच झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे ऐन गळतीच्या उंबरठ्यावर असलेल्या कांदा पिकावर अवघ्या आठ दिवसातच करपा रोगाने थैमान घातले. चालू वर्षी उन्हाळी कांदा उत्पादनात घट आली असतानाच उरलेल्या कांद्यांना आगामी काळात चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेपोटी बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा चाळीत भरला होता; परंतु आधीच गारपीट व करपा रोगाने हा कांदा बाधित असल्याने चाळीत टाकून एक ते दीड महिनाही होत नाही तोच चाळीत साठवणूक केलेला कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मिळेल त्या बाजारभावात कांदा विक्रीस काढल्याने बाजार समितीत कांदा आवक वाढल्याचे चित्र दिसून आहे. उमराणे येथे सोमवारी (दि.३१) कांदा कमीत कमी ९०० रुपये, जास्तीत जास्त २१५१ रुपये, तर सरासरी १६०० रुपये दराने विकला गेला.

कोट.....

उन्हाळी कांदा लागवडीसाठी महागडे कांदा बियाणे, तणनाशके, रासायनिक खते, लागवड, निंदणी,कांदा काढणी आदींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. असे असतानाच ऐन कांदा गळतीवेळी अवकाळी पाऊस व करपा रोगामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे आगामी काळात बाजारभाव वाढतील, या अपेक्षेने चाळीत कांदा साठवणूक केला होता; मात्र कांदा रोगाने बाधित झाल्याने चाळीतील कांदा लवकर खराब होऊन तो नाइलाजास्तव विक्री करावा लागत आहे.

- संभाजी देवरे, शेतकरी, उमराणे.

इन्फो

पिंपळगावी २५१२ रुपये भाव

पिंपळगाव बाजार समिती आवारात सोमवारी झालेल्या लिलावाप्रसंगी १०६६ वाहनांतून कांद्याची आवक झाली. यावेळी कांद्याला सर्वाधिक २५१२ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. किमान १००० ते सरासरी १८५१ रुपये भाव राहिला. बाजार समिती आवारात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, भावात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळ वाऱ्यासह पावसामुळे कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

फोटो - ३१ उमराणे ओनियन

चाळीत साठवणूक केलेला उन्हाळी कांदा खराब होऊ लागल्याने उमराणे बाजार समितीत कांदा विक्रीसाठी वाहनांची झालेली गर्दी.

===Photopath===

310521\31nsk_54_31052021_13.jpg

===Caption===

फोटो - ३१ उमराणे ओनियन चाळीत साठवणूक केलेला उन्हाळी कांदा खराब होऊ लागल्याने उमराणे बाजार समितीत कांदा विक्रीसाठी वाहनांची झालेली गर्दी. 

Web Title: Also interfere with stored onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.