रानमेव्यासह आंबे, स्ट्रॉबेरीचीही मिळाली जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST2021-06-17T04:11:09+5:302021-06-17T04:11:09+5:30
वणी : शेती हा आदिवासी बांधवांचा प्रमुख व्यवसाय. त्यावरच त्यांची उपजीविका अवलंबून आहे. मात्र, आता ...

रानमेव्यासह आंबे, स्ट्रॉबेरीचीही मिळाली जोड
वणी : शेती हा आदिवासी बांधवांचा प्रमुख व्यवसाय. त्यावरच त्यांची उपजीविका अवलंबून आहे. मात्र, आता हे चित्र बदलत चालले असून करवंद, जांभूळ या रानमेव्यांसह आंबे व स्ट्राॅबेरी यांच्या विक्रीतून आदिवासी बांधवांनी उत्पन्नाचा पर्याय शोधला आहे. शिवाय या वस्तुंच्या विक्रीसाठीचे कौशल्यही त्यांनी आत्मसात केले आहे. उदरनिर्वाहासाठी पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय करणे हा आदिवासी बांधवांचा आवडता व्यवसाय. प्रामाणिकपणा, कष्टकरी वृत्ती ही त्यांची वैशिष्ट्ये. मात्र, जसजसा काळ बदलत गेला तसतशी शेती व्यवसायाबरोबर पर्यायी उत्पन्नाची संकल्पना आदिवासी बांधवांच्या मनात रुजू लागली आहे. प्रगत तंत्रज्ञान व नवनवीन क्षेत्रातील रोजगाराच्या वाढत्या संधी यांनीही त्यांच्या पुढच्या पिढ्यांना प्रेरित केले आहे. आदिवासी बांधवांची नाळ निसर्गाशी जोडल्याने नैसर्गिक पद्धतीने उत्पादित वस्तूंच्या विक्रीतून आर्थिक वृद्धीस त्यांना हातभार लागला आहे. वणी-कळवण रस्त्यावरील अहिवंतवाडीपासून ते पायरपाडा परिसरात करवंद, जांभूळ, गावठी आंबे रस्त्यालगत विक्रीसाठी आदिवासी बांधव घेऊन बसतात. दरेगाव व बिलवाडी व सप्तशृंग गडाच्या पायथ्याच्या परिसरात या नैसर्गिक वस्तू उत्पादित होतात. बिलवाडी परिसरात तर शेकडोंच्या संख्येने आंब्याची झाडे आहेत तर डोंगराळ भागात व दऱ्याखोऱ्याच्या परिसरात करवंद व जांभळे यांच्या झाडांची संख्या मोठी असल्याची माहिती सोमनाथ गवळी यांनी दिली. या मार्गावरून गडावर जाणारे पर्यटक नैसर्गिक चवीचा आस्वाद देणारी ही फळे खरेदी करतात. त्या माध्यमातून आदिवासी बांधवांना चार पैशांची कमाई होत असते.
इन्फो
पर्यटकांकडून प्रतिसाद
वणी-सापुतारा या रस्त्यावर स्ट्राॅबेरी, जांभूळ, करवंद या फळांची विक्री करण्यात येते. खाजगी वाहने आरामदायी बसमधील प्रवासी हे त्यांचे ग्राहक असतात. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आदिवासी महिला, लहान मुले उन्हात या फळांची विक्री करताना आढळून येतात. गुजरात राज्यातील सापुतारा येथे जाणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात या फळांची खरेदी करून नैसर्गिक चव चाखतात.
कोट...
रानमेव्यासह फळांचे विशिष्ट पद्धतीने मार्केटिंग करून विक्री केल्यास व प्रोत्साहन दिल्यास आदिवासी बांधवांना बळ मिळू शकते. त्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. आदिवासी बांधवांचे निसर्गाशी असलेले नाते भावनात्मक असून निसर्गाने दिलेला ठेवा, त्याचे जतन करणे व या फळांची विक्री करून होणारी आर्थिक वृद्धी ही जीवनमानाला प्रेरणा देणारी बाब आहे.
- वामन राऊत, करंजखेड