वितरण व्यवस्थेमार्फत गुदामांमध्ये धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:55 IST2020-04-03T17:45:40+5:302020-04-03T17:55:11+5:30
नाशिक : मनमाड येथील भारतीय अन्न महामंडळ गुदामातून ६१ ट्रक धान्य प्राप्त करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत एप्रिल २०२० मध्ये त्याचे वाटप जिल्ह्यातील सर्व गुदामांमध्ये करण्यासाठी संबंधित गुदामपाल यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच शिवभोजन थाळी केंद्रांना सुधारित सूचनांप्रमाणे थाळी वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.

वितरण व्यवस्थेमार्फत गुदामांमध्ये धान्य वाटप
नाशिक : मनमाड येथील भारतीय अन्न महामंडळ गुदामातून ६१ ट्रक धान्य प्राप्त करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत एप्रिल २०२० मध्ये त्याचे वाटप जिल्ह्यातील सर्व गुदामांमध्ये करण्यासाठी संबंधित गुदामपाल यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच शिवभोजन थाळी केंद्रांना सुधारित सूचनांप्रमाणे थाळी वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यातून आलेले स्थलांतरित व जिल्ह्यांतर्गत असलेल्या बेघर व परप्रांतीय मजुरांसाठी रिलीफ कॅम्प कार्यान्वित करण्यात आले असून, त्यांची निवास व भोजन व्यवस्था करण्यावर भर दिला आहे. बेघर व स्थलांतरित नागरिकांसाठी रिलिफ कॅम्प, भारतीय अन्न महामंडळाकडून धान्यपुरवठा, दानशूर व्यक्ती व संस्था, जीवनावश्यक उद्योगांना दिलेले परवाने, अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईची जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली.
मनपा हद्दीत १८ रिलिफ कॅम्प
मुंबई, ठाणे, कल्याण येथून नाशिक येथे स्थलांतरित झालेल्या ५९० पैकी २९० लोकांची सुखदेव आश्रम, विल्होळी व ३०० लोकांची समाजकल्याण वसतिगृह, नासर्डी, नाशिक येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील ८१ बेघर व दोन हजार ३५७ परप्रांतातील अडकलेले मजूर अशा २ हजार ४३८ व्यक्तींकरिता जिल्ह्यात २३ ठिकाणी रिलीज कॅम्प सुरू करण्यात आले आहे. त्यातील १८ कॅम्प हे महानगरपालिका हद्दीत असून, त्यामध्ये १ हजार ३३४ व्यक्तींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या १८ रिलीफ कॅम्पमध्ये सद्यस्थितीला इतर राज्यांतील ८१ व स्थानिक ७५ असे १५६ मजूर राहत आहेत.