कुंभमेळ्याची सर्वच कामे अपूर्ण
By Admin | Updated: April 2, 2015 00:54 IST2015-04-02T00:52:31+5:302015-04-02T00:54:57+5:30
३१४ पैकी २३२ कामे प्रगतिपथावर : एप्रिलअखेर ‘डेडलाईन’

कुंभमेळ्याची सर्वच कामे अपूर्ण
नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून विविध पातळीवर आराखडा व नियोजन करून मंजुरी देण्यात आलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या ३१४ कामांपैकी मार्चअखेर एकही काम पूर्ण होऊ शकलेले नसल्याने पुन्हा एकदा कामाच्या संथगतीचा मुद्दा चर्चेत आला आहे. प्रत्येक विभागनिहाय घेतलेल्या आढाव्यात २३२ कामे अजूनही प्रगतिपथावर असल्याचे, तर ८२ कामांना अद्याप सुरुवातच झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने आता ही कामे पूर्ण करण्यासाठी एप्रिलअखेरची ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे.
मार्चअखेरपर्यंत कामे पूर्ण न करणाऱ्यांमध्ये नाशिक महापालिकेचा वरचा क्रमांक असून, त्यांच्या ९४ कामांपैकी १४ कामे अद्याप सुरूच होऊ शकलेली नाहीत, तर शहर पोलीस विभागाच्या आठ कामांपैकी पाच कामे तशीच पडून आहेत. आरोग्य विभागाच्या कामांबाबतही हीच परिस्थिती असून, पुरातत्व खात्याकडून कामांचा आराखडाच उशिरा सादर करण्यात आल्याने त्यांनी सुचविलेल्या सहा कामांपैकी एकही काम सुरू होऊ शकलेले नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहापैकी चार कामे, तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचेही सहापैकी पाच कामे होऊ शकलेली नाहीत. कुंभमेळ्याशी निगडित २२ यंत्रणांच्या कामांचा आढावा बुधवारी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी घेतला असता, मार्चअखेर एकाही विभागाचे एकही काम पूर्ण झाले नसल्याचे आढळून आले. सिंहस्थ कुंभमेळा दोन महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना शासकीय यंत्रणांची संथगती पाहता, या कामांच्या दर्जाबाबतही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
बुधवारी झालेल्या बैठकीत कुंभमेळ्यात ऐनवेळी करावयाच्या कामांचीही चर्चा होऊन त्याचेही नियोजन आत्तापासून करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रगतिपथावर असलेली २३२ कामे एप्रिलअखेर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची कालमर्यादा घालून देण्यात आली आहे. कामे उशिरा सुरू होण्यामागे निधीची अपूर्तता, निविदा प्रक्रियेला झालेला विलंब याच बाबी पुढे करण्यात आल्या आहेत.