आज संध्याकाळपर्यंत सर्व रस्ते खुले

By Admin | Updated: August 28, 2015 00:20 IST2015-08-28T00:19:50+5:302015-08-28T00:20:10+5:30

‘नो एन्ट्री’वगळून पर्वणीच्या दिवशी सर्वत्र व्यवहार सुरळीत

All the roads open till this evening | आज संध्याकाळपर्यंत सर्व रस्ते खुले

आज संध्याकाळपर्यंत सर्व रस्ते खुले

नाशिक : कुंभमेळ्याच्या शाहीस्नानाची पहिली पर्वणी शनिवारी (दि.२९) पार पडणार आहे. या पर्वणीसाठी शहर पोलीस यंत्रणा सज्ज असून, नाशिककरांनी अवघे ३६ तास यजमान म्हणून यंत्रणेला सहकार्य करावे. शुक्रवारी (दि.२८) संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शहरामध्ये सर्वत्र मुक्तपणे फिरता येणार आहे; मात्र सहा वाजेनंतर ‘नो एन्ट्री’, ‘नो व्हेईकल झोन’च्या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार असून भाविक मार्ग, प्रशासकीय मार्गांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
नाशिककरांनी आपापसामध्ये कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये व विश्वासही दाखवू नये. शंका, संभ्रम दूर करण्यासाठी थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जगन्नाथन यांनी केले आहे. दरम्यान, नो एन्ट्रीचा परिसर वगळता शहरामधील अन्य भागातील तसेच उपनगरांमध्ये सर्व व्यवहार नाशिककर पर्वणीच्या दिवशीही सुरळीतपणे सुरू ठेवू शकतात. तसेच ‘नो एन्ट्री’चा परिसर सोडून शहरात व उपनगरांमध्ये सहजरीत्या दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करता येणार आहे; मात्र शक्यतो चारचाकी आवश्यक असेल तरच वापरण्याचा सल्लाही आयुक्तांनी जनतेला दिला आहे.
भाजीपाला, दूध, वर्तमानपत्रे यांची वाहतूक करणारी वाहने, नोकरदार वर्गही शहरामध्ये शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सहजरीत्या ये-जा करू शकतात. त्यानंतर या वाहनांना व नोकरदारांना वाहतूक नियोजन आराखड्यातील ‘क्रॉस ओव्हर पॉइंट’चा वापर करून इच्छित स्थळी पोहचावे लागेल, असे त्यांनी सांगितले. तसेच पर्वणीच्या दिवशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या वाहनांना सीबीएसच्या शिवाजी स्टेडियमपर्यंत परवानगी राहणार आहे. तेथून पुढे पायी जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: All the roads open till this evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.