सर्वच पक्षांचे टार्गेट भाजपा !
By Admin | Updated: February 5, 2017 23:18 IST2017-02-05T23:18:20+5:302017-02-05T23:18:44+5:30
गुन्हेगारी, नोटाबंदी, पैशांची मागणी ठरणार प्रचाराचे मुद्दे

सर्वच पक्षांचे टार्गेट भाजपा !
नाशिक : शहरातील नामचीन गुंडांना पक्षप्रवेश देऊन पावन करणे, उमेदवारी देण्यासाठी उघड उघड पैशांची मागणी करणे याचबरोबर केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीचा सर्वसामान्यांना फटका बसणे हेच महापालिका निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे राहणार असून, मित्रपक्ष सेनेसह सर्व विरोधी पक्षांच्या रडारवर ‘भाजपा’ हाच एकमेव पक्ष राहणार आहे.
केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाने निवडणुकीनंतर मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडल्याची भावना शिवसेनेसह रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्षामध्ये पसरली असून, राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ते आणखीच उघड झाले आहे. त्यामुळे या पक्षांच्या नाराजीचा सामना भाजपाला करावा लागणार असून, महापालिकेच्या निवडणुका स्थानिक प्रश्नावर लढविल्या जातात ते पाहता नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने आजवर दिलेल्या गुन्हेगारांना आश्रयाचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्याचा विचार विरोधी पक्षांनी करून ठेवला आहे. ज्यांच्यावर खून, खंडणी, प्राणघातक हल्ला करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, अशांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे, ते पाहता शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. विरोधी पक्षात असताना भाजपाने नेहमीच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून तसेच गुन्हेगारांना राजाश्रय देणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलने केली असल्याने आता तोच मुद्दा त्यांच्याविरुद्ध वापरला जाणार आहे. त्याचबरोबर स्वच्छ व शुद्ध राजकारण करण्याची भाषा एकीकडे करीत असताना दुसरीकडे पक्षाची उमेदवारी पैसे घेऊन वाटण्याचा बाजारच भाजपाने मांडल्याच्या ध्वनिचित्रफिती एका मागोमाग व्हायरल होत असल्याची बाब विरोधकांच्या पथ्थ्यावर पडली आहे. याच मुद्द्याच्या आधारे भाजपाला घेरण्याची तयारी केली जात असून, सामान्यांना बॅँकेतून पुरेसे पैसे मिळत नसताना भाजपा त्यांच्या उमेदवारांकडे दोन लाखाची मागणी कशाच्या आधारे करते? दहा लाख रुपये त्यांचे इच्छुक उमेदवारीसाठी कोठून आणतात, अशा प्रश्नांची उत्तरे आता भाजपाला द्यावी लागणार आहेत. (प्रतिनिधी)