जिल्ह्यात दारू विक्रीत ५० टक्के घट
By Admin | Updated: May 6, 2017 01:50 IST2017-05-06T01:50:29+5:302017-05-06T01:50:46+5:30
नाशिक : सर्वोेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पिण्यावर आलेल्या बंदीचा परिणाम एक महिन्याने समोर आला आहे

जिल्ह्यात दारू विक्रीत ५० टक्के घट
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सर्वोेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पिण्यावर आलेल्या बंदीचा परिणाम एक महिन्याने समोर आला असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागात विदेशी दारू विक्री थेट पन्नास टक्के इतकी घटली आहे, त्यामानाने देशी दारूच्या विक्रीत काही प्रमाणात वाढ झाल्याची आकडेवारी राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या मासिक बैठकीतून उघड झाली आहे.
राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक आर. बी. जावळे-पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्ह्यातील निरीक्षकांची आढावा बैठक घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटर अंतरावर असलेल्या मद्यविक्री दुकानांचे परवाने १ एप्रिलपासून नूतनीकरण न करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील जवळपास ७० टक्के बिअर बार, परमिट रूम, वाइन शॉप, बिअर शॉपी व देशी दारूची दुकाने अशा सर्व प्रकारची दुकाने बंद झाल्याने त्याचा मद्यविक्रीवर किती परिणाम झाला याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. नाशिक मनपा व तालुका कार्यक्षेत्र वगळता उर्वरित जिल्ह्यात गेल्या एका महिन्यात सर्व प्रकारच्या मद्यविक्रीवर त्याचा परिणाम झाल्याची आकडेवारी यावेळी सादर करण्यात आली. त्यात विदेशी मद्यावर ५१ टक्के, बिअरवर ५१ टक्के, तर वाइनवर ४९ टक्के विक्रीवर परिणाम झाला आहे. एकीकडे महामार्गावरील विदेशी दारूची विक्री पन्नास टक्क्याने घटली असताना देशी दारूच्या विक्रीत तीन टक्क्याने वाढ झाल्याने राज्य उत्पादन शुल्क खात्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. विदेशी दारूचे सेवन करणारे दारू मिळत नाही म्हणून देशी दारूकडे वळाले की, देशी दारू सेवन करणारे नवीन ग्राहक तयार झाले हे समजू शकले नसले तरी, देशी दारूच्या वाढलेल्या विक्रीबद्दल राज्य उत्पादन शुल्क खात्याने समाधान व्यक्त केले.