१०५ घरांमध्ये एडीस डासांच्या अळ्या
By Admin | Updated: November 21, 2014 01:12 IST2014-11-21T01:11:38+5:302014-11-21T01:12:27+5:30
१०५ घरांमध्ये एडीस डासांच्या अळ्या

१०५ घरांमध्ये एडीस डासांच्या अळ्या
नाशिक : शहरात थैमान घातलेल्या डेंग्यूच्या आजाराला कारणीभूत असलेल्या एडीस डासांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करण्याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आपला मोर्चा वळविला असून, गेल्या सप्ताहात महापालिकेने शहरातील २१ हजार ७१५ घरांना भेटी दिल्या असता १०५ घरांमध्ये एडीस डासांच्या अळ्या आढळून आल्या. दरम्यान, गेल्या वीस दिवसांत शहरात डेंग्यूसदृश २७२ रुग्ण आढळून आले, तर रक्तनमुन्यांच्या तपासणीत १०८ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.शहरात डेंग्यूचा उद्रेक वाढत असल्याने नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वीस दिवसांत शहरात डेंग्यूसदृश २७२ रुग्ण आढळून आले. त्यातील २१८ रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता त्यातील १०८ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यात ९६ रुग्ण हे महापालिका हद्दीतील असून, १२ रुग्ण ग्रामीण भागातील असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गायकवाड यांनी दिली. दरम्यान, डेंग्यू रोखण्यासाठी पालिकेने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक प्रभागात एक पथक तयार केले असून, या पथकांमार्फत एडीस डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ती नष्ट केली जात आहेत.
प्रामुख्याने पाण्याचे ड्रम, टायर्स, फुलझाडांच्या कुंड्या यांची तपासणी करण्यात येत आहे; शिवाय अळीनाशक फवारणीही केली जात आहे. एडीस डासांची उत्पत्ती ही साठवून ठेवलेल्या स्वच्छ पाण्यातच होत असल्याने साठविलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे. पालिकेने त्यासाठी पथकांची निर्मिती केली आहे.
महापालिकेचे ६६, तर कंत्राटदारांचे १९२ कर्मचारी त्यात काम करत आहेत. गेल्या सप्ताहात शहरातील ६१ प्रभागांमधील २१ हजार ७१५ घरांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यात १०५ घरांमधील १६९ भांड्यांमध्ये एडिस डासांच्या अळ्या सापडल्याची माहिती पालिकेचे डॉ. सचिन हिरे यांनी दिली. महापालिकेने शहरात ही मोहीम राबवून ५६ टायर्स जप्त केल्याचेही हिरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)