अहिवंतवाडीलगत दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: December 27, 2015 23:10 IST2015-12-27T23:07:23+5:302015-12-27T23:10:25+5:30
अपघात : अज्ञात वाहनाची धडक

अहिवंतवाडीलगत दुचाकीस्वार ठार
वणी : सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या अहिवंतवाडी फाट्यालगत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालक जागीच ठार झाला. शनिवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला.
अहिवंतवाडी परिसरातून दगड पिंपरी येथील सुधाकर चौधरी रात्री बारा वाजेनंतर दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौधरी जागीच ठार झाले. वणी-कळवण रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाच्या नजरेस हा प्रकार आल्यानंतर त्यांनी चौधरी यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टर राजेंद्र बागुल यांनी सुधाकर चौधरी यांना मयत घोषित केले. अपघातानंतर कडाक्याच्या थंडीचा परिणाम तसेच मध्यरात्रीमुळे वेळेवर उपचार न झाल्याने चौधरी यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. दरम्यान, चौधरी यांच्यासमवेत कोणी व्यक्ती होती का याविषयी खातरजमा करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू असून, या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)