कांदाप्रश्नी शेतकऱ्यांचा उद्रेक

By Admin | Updated: July 29, 2016 01:02 IST2016-07-29T00:58:37+5:302016-07-29T01:02:44+5:30

कळवण तालुका बंद : पिंपळगावला लिलाव पाडले बंद, देवळ्यात रास्ता रोको

Agrochemicals Outbreaks | कांदाप्रश्नी शेतकऱ्यांचा उद्रेक

कांदाप्रश्नी शेतकऱ्यांचा उद्रेक

कळवण : प्रचलित पद्धतीने कांदा खरेदी करावा आणि कांद्याला हमभाव द्यावा, या प्रमुख मागणीसाठी कळवण तालुक्यातील हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बुधवारी कळवण येथे रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर आज गुरुवारी तालुका बंद करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावनांची व्यापारी आणि शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी कळवण तालुक्यातील जनतेने केली असून, आजच्या बंदमध्ये व्यापारी, व्यावसायिक, हातगाडी, हॉटेल आणि हातावरील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन शेतकऱ्यांच्या भावनांची कदर करून मागणीला पाठिंबा दिला. बंदमध्ये सहभागी होऊन शासनाचे धोरण आणि व्यापाऱ्यांच्या भूमिकेचा निषेध नोंदवला.
भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पोपट पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, रिपाइंचे तालुकाध्यक्ष बापू जगताप यांनी बुधवारी कळवण शहरात व तालुक्यात गावोगावी फिरून कळवण तालुका बंद करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन कळवण शहरात व तालुक्यात आज सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. शासनाने या बंदची आणि कळवण येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनाची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा व प्रचलित पद्धतीने कांदा लिलाव व्हावेत नाहीतर कळवण तालुक्यात उग्र आंदोलन करण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकरी, सर्वपक्षीय पदाधिकारी व नेते यांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Agrochemicals Outbreaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.