कृषी अधिकाऱ्यांकडून बांधावर जात पिकाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:27 IST2021-02-16T21:05:11+5:302021-02-17T00:27:53+5:30
नांदूरवैद्य : थंडीच्या लाटेमुळे टोमॅटोसह अन्य पिकांचे नुकसान होत असल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कृषी विभागाच्यावतीने उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. याच पार्श्वभूमीवर लुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीमंडळ अधिकारी भास्कर गीते, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते आदींनी खेड, परदेश वाडी येथील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जात टोमॅटोसह इतर पिकांची पाहणी करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कृषी अधिकाऱ्यांकडून बांधावर जात पिकाची पाहणी
टोमॅटो पिकाची कृषी विभागाच्यावतीने पाहणी करण्यात यावी याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये दि.१४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होताच याची तातडीने कृषी विभागाने दखल घेतली. कृषी अधिकाऱ्यांनी परदेश वाडी, खेड येथे टोमॅटो पिकाची पहाणी केली असता रोग किडीच्या प्रादुर्भावापेक्षा अन्नद्रव्य व्यवस्थापनातील त्रुटी आढळून आल्या. तापमानातील चढ-उतारामुळे पाने गोल होत असून वातावरणातील सततच्या बदलांमुळे टोमॅटोच्या झाडामध्ये अजैविक ताण निर्माण होतो. यासाठी ग्रेड २ सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणी करण्यात यावी. यामुळे पिकांवरील कीडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल असे यावेळी कृषीमंडळ अधिकारी भास्कर गीते यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.
गेल्या पंधरा दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात वाढ होत असून तापमानातील चढ उतारांमुळे पिकांवर परिणाम होतांना दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता योग्य वेळी योग्य कीटकनाशकांची फवारणी करावी.
- शीतलकुमार तंवर, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी