नांदूरशिंगोटे परिसरातील शेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2015 23:03 IST2015-09-02T23:02:37+5:302015-09-02T23:03:30+5:30

शेतकरी हतबल : भोजापूर धरण न भरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

Agricultural hazard in the area of ​​Nandurshingo | नांदूरशिंगोटे परिसरातील शेती धोक्यात

नांदूरशिंगोटे परिसरातील शेती धोक्यात

सचिन सांगळे, नांदूरशिंगोटे
सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठे भोजापूर धरण अद्याप न भरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धरणात जेमतेम १५ टक्के साठा असल्याने त्यातील पाणी केवळ पिण्यासाठी वापरावे लागणार असल्याने या धरणाच्या लाभक्षेत्रातील शेती व्यवसाय संकटात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
म्हाळुंगी नदीवर चास खोऱ्यात वसलेले भोजापूर हे मातीचे धरण तालुक्यात सर्वात मोठे असून, त्याची पाणी साठवण क्षमता ३६५ दशलक्ष घनफूट आहे. या धरणाच्या पाण्यातून परिसरातील शेतकऱ्यांना वर्षातून दोन वेळा शेतीच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले जाते. या पाण्यावर परिसरातील हजारो एकर शेती ओलिताखाली येते. दरवर्षी आॅगस्ट महिन्यातच ओसंडून वाहणारे धरण यावर्षी भरले नसल्याने चिंता वाढली आहे.
यावर्षी तर पावसाळा शेवटच्या चरणात असताना धरणात केवळ ४५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या चार वर्षांपासून खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना फारसे उत्पन्न मिळाले नाही. यावर्षीही तशीच परिस्थिती असल्याने शेतीचे उत्पन्न मिळते की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
धरणातील पाण्यावर मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा व कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. याव्यतिरिक्त संगमनेर तालुक्यासाठी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी २० टक्के पाणी आरक्षित केले जाते. यावर्षी धरणात अद्याप समाधानकारक पाणी न आल्याने त्यातील पाणी
पाणीपुरवठा योजनेसाठीही पुरते की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
भोजापूर धरण ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यातील पूरपाणी तालुक्याच्या पूर्व भागातील दूशिंगपूर, माळवाडी (फुलेनगर), दातली व पिंपळे या मोठ्या बंधाऱ्यात सोडण्यात येते. पूरपाण्यामुुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होतो. तथापि, यावर्षी धरणच भरले नसल्याने शेतकऱ्यांची खरिपासह रब्बीची पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर्षी धरणच भरत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी धरणात असलेल्या साठ्यावर शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागणार आहे, तर शेतीसाठी पाण्याचे आवर्तन मिळण्याची शक्यता मावळली आहे.
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विश्रामगडाच्या पायथ्याशी पाऊस झाल्यानंतर म्हाळुंगी नदीला पाणी येते. यावर्षी म्हाळुंगी नदी वाहू लागताच पाऊस थांबला. त्यामुळे भोजापूर धरणात जेमतेम १५ ते २० टक्के पाणी आले. त्यानंतर नदीचा प्रवाह बंद झाला.
त्यामुळे भोजापूर धरणात नवीन पाण्याची आवक होऊ शकली नाही. नांदूरशिंगोटे परिसरासाठी भोजापूर धरण वरदान आहे. तथापि, यावर्षी त्यात पाणीसाठा कमी असल्याने या परिसरातील शेती व्यवसाय धोक्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धरणात २० टक्क्याच्या आसपास पाणी दिसत असले, तरी त्यात गाळ मोठ्या प्रमाणात असल्याने दिसतो तेवढा पाणीसाठा धरणात नाही. पावसाळ्याच्या शेवटच्या चरणात जोरदार पाऊस होऊन धरण
ओसंडून वाहण्याची प्रार्थना शेतकऱ्यांकडून वरुणराजाला केली जात आहे. (वार्ताहर)

पाणी उपसा थांबविण्याची गरज

भोजापूर धरणात यावर्षी केवळ १५ टक्के पाणीसाठा आहे. आहे त्या पाण्याचा अवैध उपसा होत आहे. धरणातील पाणी पाणीयोजनांसाठी वर्षभर पुरते की नाही याबाबत साशंकता आहे. पाणीउपसा झाल्यास पाणीयोजना संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महसूल व पाटबंधारे विभागाने अवैध उपसा थांबविण्यासाठी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
 

Web Title: Agricultural hazard in the area of ​​Nandurshingo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.