चौदा वर्षानंतर निफाडला लाल दिवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:19 IST2020-01-02T22:18:55+5:302020-01-02T22:19:53+5:30
नाशिक जिल्हा परिषदेचे बहु प्रतीक्षेत असलेले अध्यक्षपद तब्बल चौदा वर्षानंतर पुन्हा एकदा बाळासाहेब क्षीरसागर यांच्या रूपाने निफाड तालुक्याला मिळाले. निफाडला अखेर लाल दिवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळाला.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या कुटुंबा समवेत आई इंदूबाई क्षीरसागर पत्नी मुक्ताताई क्षीरसागर, बंधू सुभाष क्षीरसागर, संजय क्षीरसागर, मुलगा मयूर, भावजयी ,मुली
बाजीराव कमानकर।
सायखेडा : नाशिक जिल्हा परिषदेचे बहु प्रतीक्षेत असलेले अध्यक्षपद तब्बल चौदा वर्षानंतर पुन्हा एकदा बाळासाहेब क्षीरसागर यांच्या रूपाने निफाड तालुक्याला मिळाले. निफाडला अखेर लाल दिवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळाला.
द्राक्षपंढरी म्हणून ओळख असणाऱ्या शिवडीसारख्या छोट्या गावात शेतकरी कुटुंबात १९६५ साली जन्माला आलेले बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर यांचा सामाजिक, राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. तालुक्यातील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख असणारे आर,.डी. क्षीरसागर आणि इंदूबाई यांना तीन मुले आणि एक मुलगी. सर्वात मोठे बाळासाहेब यांचे प्राथमिक शिक्षण शिवडीच्या प्राथमिक शाळेत झाले. त्यांना शिवडी गावाने विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड केली आणि तेथूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरवात झाली. नातेगोते असल्याने त्यांची लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाली. त्यानंतर तत्कालीन आमदार अनिल कदम यांनी विश्वास दाखवत त्यांना बाजार समितीच्या उपसभापती पदावर बढती दिली. शेतकरी ,मजूर यांना वेळेवर कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी स्वत:ची चांदोरी येथे मुक्ताई को अपरेटिव्ह बँकेची स्थापना केली त्या माध्यमातून लोकसंपर्क वाढत गेला. निफाड येथे लोकनेते आर डि क्षीरसागर सहकारी बँकची सुरवात केली. निफाड शहर जवळ असल्याने त्यांनी मित्रपरिवार जमा केला. उगाव गावात अनेक शाळेतील मित्र, नातेवाईक असल्याने त्यांनी जिल्हा परिषदेची उमेदवारी करावी म्हणून गळ घातली. अनिल कदम यांनी शिवसेनेचे तिकीट देऊन त्यांनी निवडणूक लढविली. अगदी कमी फरकाने त्यांचा विजय झाला असला तरी नशीब बळकट म्हणून की काय त्यांचे जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी निवड झाली आज पुन्हा एकदा नशिबाने साथ दिली आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबातील क्षीरसागर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले.
शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
निफाड व नाशिक येथे बी कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नोकरीच्या शोध न घेता कुटुंबाच्या समवेत शेती करण्यास सुरूवात केली, शिक्षण झाले असल्यामुळे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष शेती केली. द्राक्ष पीक हे त्याकाळात खूपच कमी शेतकरी लागवड करत असे, मात्र बाळासाहेबांनी द्राक्ष पिकात भरघोस उत्पादन घेतले आणि त्यामुळे वयाच्या विसाव्या वर्षी द्राक्ष बागायतदार पुणे येथे संचालक मंडळाने सभासद करून घेतले आणि संचालक म्हणून निवड केली. परिसर द्राक्षाचा होत असल्याने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांनी स्वत:चे कोल्डस्टोरेज उभारले.