मनपा आयुक्तांच्या भूमिकेला भाजपानंतर सेनेचेही समर्थन
By Admin | Updated: June 9, 2017 01:42 IST2017-06-09T01:42:33+5:302017-06-09T01:42:54+5:30
अधिकाऱ्यांची चौकशी : दोषींवर कारवाईची मागणी; संशयित अधिकाऱ्यांना शासन व्हावे

मनपा आयुक्तांच्या भूमिकेला भाजपानंतर सेनेचेही समर्थन
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी गैरकारभारप्रकरणी संशयित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीचा बडगा उगारल्यानंतर भाजपा पाठोपाठ आता शिवसेनेनेही आयुक्तांच्या भूमिकेचे समर्थन केले असून, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व गटनेता विलास शिंदे यांनी केली आहे.
आयुक्तांनी अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन यांची विभागीय चौकशी करण्याचे तसेच निवृत्त अधीक्षक अभियंता आर. के. पवार आणि निवृत्त उपअभियंता आगरकर यांच्या रखडलेल्या चौकशीचा सद्यस्थितीचा अहवाल मागविल्याने महापालिका अधिकारी व कर्मचारी वर्गात खळबळ उडाली. याशिवाय, काही संशयित अधिकाऱ्यांचीही चौकशी लावण्याचे संकेत आयुक्तांनी दिले. आयुक्तांच्या या भूमिकेचे अगोदर महापौर रंजना भानसी यांनी समर्थन केले होते. भाजपा पाठोपाठ आता शिवसेनेचे अजय बोरस्ते व विलास शिंदे यांनी पत्रक प्रसिद्धीस देत आयुक्तांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. पत्रकात म्हटले आहे, शिवसेनेने यापूर्वीच खतप्रकल्प, घरकुल योजना, पावसाळी गटार योजना, एलइडी व इतर योजनांमध्ये झालेल्या गैरप्रकारांसंबंधी चौकशीची मागणी केलेली होती. मात्र अहवाल धूळ खात पडून होता. पालिका आयुक्तांनी दाखविलेले धाडस स्वागतार्ह आहे. अधिकाऱ्यांची चौकशी होऊन दोषींना शासन झालेच पाहिजे. शिवसेना कुणाही अधिकाऱ्याला पाठीशी घालणार नसल्याचेही बोरस्ते व शिंदे यांनी म्हटले आहे.चौकशीचा फार्स नकोपालिका आयुक्तांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु विभागीय चौकशीचा आदेश हा केवळ फार्स न ठरता सदर चौकशी मर्यादित वेळेत व पारदर्शकपणे पूर्ण करावी, अशी मागणीही शिवसेनेने केलेली आहे.