तीस वर्षांनी नाशिकच्या मुलींचा खो-खो संघ उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:13+5:302021-09-06T04:19:13+5:30
नाशिक : आदिवासी भागातील चपळ मुलींची निवड करून गत चार वर्षांपासून जिल्हा खो-खो संघटनेच्या प्रबोधिनीत घडत असलेल्या नाशिकच्या मुलींनी ...

तीस वर्षांनी नाशिकच्या मुलींचा खो-खो संघ उपांत्य फेरीत
नाशिक : आदिवासी भागातील चपळ मुलींची निवड करून गत चार वर्षांपासून जिल्हा खो-खो संघटनेच्या प्रबोधिनीत घडत असलेल्या नाशिकच्या मुलींनी तब्बल ३० वर्षांनंतर राज्य खो-खो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारत इतिहास घडवला. सांगली संघाविरुद्धच्या अटीतटीच्या उपांत्यपूर्व सामन्यात नाशिकच्या संघाने २७ विरुद्ध २५ असा २ गुणांनी विजय मिळवत तीन दशकांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
शेवगावनगर येथे ४७ वी महाराष्ट्र कुमार व मुली गट स्पर्धा शेवगाव स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत नाशिकच्या मुलींनी चमत्कार घडवला. नाशिकच्या संघाने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रत्नागिरीवर १ डाव व १० गुणांनी मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केल्याने मुलींमधील आत्मविश्वास बळावला होता. त्यानंतर रविवारी मुलींचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना गत वर्षीच्या तृतीय स्थानावर असलेल्या सांगली संघाशी होता. विलक्षण चुरशीने खेळला गेलेला हा सामना १८ विरुद्ध १८ असा बरोबरीत सुटला. आपल्या पहिल्या आक्रमणात नाशिकने सांगलीचे १० गडी बाद केले. वृषाली भोये ४ गडी, कौसल्या पवार ३ गडी, सोनाली पवार २ गडी तर सरिता दिवा १ गडी यांच्या खेळानेच ते शक्य झाले. सांगलीने नाशिकचे ९ गडी बाद केले. नाशिककडून सोनाली पवार १.३०, दीदी ठाकरे १.१० व १ मिनिट नाबाद, निशा वैजल १ मिनिट यांनी चांगला पळतीचा खेळ केला. मध्यंतराला नाशिककडे १ गुणांची आघाडी होती व ती अखेर निर्णायक ठरली. तर दुसऱ्या आक्रमणात नाशिकच्या वृषाली भोये २ गडी, कौसल्या पवार २ गडी, सोनाली पवार २ गडी, तर मनीषा पडेर व यशोदा देशमुख प्रत्येकी १ गडी बाद केला. तर सोनाली पवार व तेजल सहारे प्रत्येकी १ मिनीट, यशोदा देशमुख, दीदी ठाकरे व कौसल्या पवार यांनी प्रत्येकी १.२० सेकंद तर सरिता दिवा १.३० सेकंदाचा खेळ करून सामना १८ विरुद्ध १८ असा बरोबरीत सुटला. नाशिकने आपल्या तिसऱ्या आक्रमणात सांगलीचे ९ गडी बाद केले व त्यांच्या पुढे १० गडी मारण्याचे आव्हान उभे केले. नाशिकच्या वृषाली भोयेने तिसऱ्या आक्रमणात तीन गडी बाद केले. या संपूर्ण सामन्यात वृषाली भोयेने एकूण ९ गडी बाद करण्याची कामगिरी करून दाखवली. या सामन्यात कौसल्या व सोनाली पवार या दोन्ही बहिणींनी प्रत्येकी ६ गडी बाद केले. तसेच दीदी ठाकरे ३ गडी, कौसल्या पवार १ गडी तर सोनाली पवार हिने २ गडी बाद केले. तर बचाव करताना मनीषा पडेर २ मिनिट, ऋतुजा व तेजल सहारे प्रत्येकी १.१० सेकंद, सोनाली पवार १ तर दीदी ठाकरे १.२०, कौसल्या पवार १.३० यांच्या अष्टपैलू खेळीने नाशिकने सांगलीचा २७ विरुद्ध २५ असा दोन गुणांनी पराभव करून ३० वर्षांनंतर मुलींच्या गटात उपांत्य फेरीत रुबाबात प्रवेश केला.
इन्फो
प्रबोधिनीने घडवला चमत्कार
गेल्या तीन वर्षांपासून नाशिकचा १४ वर्षांखालील स्पर्धेत उपविजेता संघ आहे. या सर्व मुली गेल्या चार वर्षांपासून जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय संचालित नाशिक जिल्हा खो-खो असो संचालित प्रबोधिनीतील आहेत. या सर्व मुली कुळवांडी, पेठ सुरगाणा, तोरंगण, त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी पाड्यावरील आहेत. खो-खो संघटक मंदार देशमुख तसेच प्रशिक्षक गीतांजली सावळे आणि प्रशिक्षक उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ घडत आहे.
फोटो
०५खो-खो