बाधित शेतकऱ्यांना पाचपट मोबदला मिळवून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST2021-06-16T04:19:55+5:302021-06-16T04:19:55+5:30
नाशिक तालुक्यातील नानेगाव व परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक कार्यालयात भेट घेऊन मागणीचे निवेदन ...

बाधित शेतकऱ्यांना पाचपट मोबदला मिळवून देणार
नाशिक तालुक्यातील नानेगाव व परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक कार्यालयात भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे नानेगाव येथे पुणे - नाशिक रेल्वेमार्गाचे भूसंपादन व अधिग्रहित शेतजमिनीचे मोजणीचे काम सुरू आहे. सदर भूसंपादन हे गावातील २१.५ हेक्टर बारमाही बागायती क्षेत्राचे होणार आहे. या क्षेत्रात द्राक्षे, कांदा, ऊस, फळझाडे व इतर बागायती नगदी पिके घेतली जातात. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व भौगोलिक नुकसान होणार असून, बाधित शेतकऱ्यांची जमीन बारमाही बागायती असल्यामुळे तसेच उदरनिर्वाहाचे साधन शेतीच असल्याने जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी केली आहे.
तसेच रेल्वेलाइनमुळे शेतकऱ्यांच्या क्षेत्राची दोन ते तीन तुकड्यात विभागणी होणार असल्याने त्या संपूर्ण क्षेत्राची संमतीनुसार खरेदी करण्यात यावी, द्राक्षबागा निर्यातक्षम दर्जाच्या असल्याने त्या निर्यातदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे द्राक्षबाग शेती क्षेत्राची विभागणी झाल्यास उर्वरित संपूर्ण द्राक्षबागेची व इतर साधन सामग्रीची व बांधावरील फळझाडांचा योग्य मोबदला मिळावा. बाधित होणाऱ्या पाइपलाइन पंचवीस मीटरवर क्राॅसिंग होण्याकरिता व्यवस्था असावी. पाइपलाइन, विहीर, बोअरवेल यांचा योग्य मोबदला मिळावा. बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा व त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकास नोकरी मिळावी. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या क्षेत्राच्या व्यतिरिक्त रेड झोन नसावा, गावातील रेल्वेमार्गातील बाधित होणारे वागवहीवाटीच्या रस्त्यांना क्रासिंग येणे-जाण्याची योग्य ती व्यवस्था करावी अशा विविध मागण्या केल्या आहेत. यावेळी बाधित शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे, केरू काळे, वासुदेव पोरजे, ज्ञानेश्वर काळे, अशोक आडके, योगेश काळे, प्रकाश आडके, सुकदेव आडके, मुकुंद गोसावी, राजाराम शिंदे यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते. (फोटो १४ भुजबळ)