ग्रामीण भागातील रस्ते घेणार दत्तक
By Admin | Updated: February 28, 2017 01:26 IST2017-02-28T01:26:37+5:302017-02-28T01:26:51+5:30
नाशिक : राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग दत्तक घेणार अशी घोषणा राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

ग्रामीण भागातील रस्ते घेणार दत्तक
नाशिक : राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग दत्तक घेणार असून, रस्ते दुरुस्तीसाठी दहा किलोमीटरपर्यंतचे टप्पे तयार करण्यात येणार आहे. जो ठेके दार रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेईल, त्यासोबत वर्षभरासाठी रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा करार केला जाईल, अशी घोषणा राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी पाटील नाशिकमधील सार्वजनिक बांधकाम भवन येथे आले होते. यावेळी त्यांनी विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन तास बैठक घेऊन विविध पातळीवरील कामांची स्थिती जाणून घेतली. यावेळी पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले, विविध कामांची प्रलंबित देयके त्वरित अदा करण्यासाठी आवश्यक कार्यवाहीबाबत सूचना दिल्या आहेत.
गावपातळीवरील रस्ते दुरुस्तीसाठी दहा किलोमीटरचे टप्पे करून वार्षिक दुरुस्ती करार तत्त्वानुसार संबंधित कामासाठी ठेकेदाराची निवड केली जाईल, असे ते म्हणाले. यामुळे गावपातळीवरील रस्ते दर्जेदार होण्यास मदत होईल. तसेच रस्त्यांची वेळोवेळी देखभाल दुरुस्तीकडे लक्ष पुरविले जाणार असल्यामुळे रस्ते खड्डेमुक्त राहतील, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीप्रसंगी विविध अधिकारी उपस्थित होते.