भारनियमनामुळे आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत अडसर
By Admin | Updated: June 11, 2017 00:26 IST2017-06-11T00:26:11+5:302017-06-11T00:26:21+5:30
तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली ग्राहकांना घाम फोडणाऱ्या नाशिक : महावितरणकडून अघोषित भारनियमन करून आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेतही अडसर निर्माण होत आहे.

भारनियमनामुळे आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत अडसर
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कधी विजेच्या तुटवड्याचे कारण तर कधी तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली ग्राहकांना घाम फोडणाऱ्या महावितरणकडून अघोषित भारनियमन करून आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेतही अडसर निर्माण होत आहे. सध्या शहरातील अनेक विद्यार्थी अकरावीची आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण करीत असून, बारावीचा निकाल जाहीर झाल्याने तंत्र व उच्चशिक्षणाच्या प्रवेशप्रक्रियाही सुरू झाल्या आहेत. मात्र, महावितरणकडून होत असलेल्या अनियमित भारनियमनामुळे आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत अडसर निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बारावीच्या गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर विविध विद्याशाखांच्या आॅनलाइन प्रवेशासाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढला असून, यावर्षापासून पहिल्यांदाच अकरावीची प्रवेशप्रक्रियाही आॅनलाइन करण्यात आल्याने आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व्यस्त आहेत.
नाशिकसह विभागातून हजारो विद्यार्थी अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची शक्यता असून, अशा विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंगची ४६ व फार्मसीची ३८ सुविधा केंदे्र सुरू करण्यात आली आहेत. तर शहरातील सुमारे दीडशेहून अधिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असताना शहरात विजेचा खेळ खंडोबा सुरूच असल्याने विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज करताना अडचणी येत आहेत.
काही ठिकाणी इन्व्हर्टर तथा जनरेटरचा वापर करून प्रक्रिया सुरळीत पार पडली असली तरी अशी व्यवस्था नसलेल्या केंद्रांवर विद्यार्थ्यांना थांबून पुन्हा नव्याने अर्ज भरण्यास सुरुवात करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये महावितरण विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश अर्ज भरताना अडचणी निर्माण होत आहेत.