प्रशासन सुस्त : सेतू केंद्रचालक मेटाकुटीस
By Admin | Updated: May 31, 2017 00:59 IST2017-05-31T00:58:54+5:302017-05-31T00:59:41+5:30
सर्व्हर डाउनमुळे तीन हजार दाखले पडून

प्रशासन सुस्त : सेतू केंद्रचालक मेटाकुटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या महिन्यापासून धीम्या गतीने चालणाऱ्या महाआॅनलाइन या शासकीय दाखले तयार करणाऱ्या सॉफ्टवेअरचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे सुमारे तीन हजारांहून अधिक शासकीय दाखले सेतू व महा ई सेवा केंद्रचालकांकडे पडून असून, त्यातच मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थी, पालकांची दाखल्यांसाठी होणारी गर्दी पाहता, त्यामानाने जिल्हा प्रशासन सुस्त आहे.
शाळा व महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्न, जात, नॉनक्रिमीलेअर, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व अशा विविध दाखल्यांची गरज आहे. बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी दाखले मिळविण्यासाठी बुधवारपासून विद्यार्थी व पालकांची गर्दी होणार असताना प्रत्यक्षात गेल्या महिन्यापासून शासनाच्या ‘महाआॅनलाइन’चे सर्व्हर डाउन झाल्याने त्यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे सेतू व महा ई सेवा या केंद्रचालकांकडे तीन हजार दाखले पडून आहेत. सर्व्हर डाउन झाल्यामुळे दाखले तयार करण्यास विलंब होत असून, दिवसाकाठी दहा ते बारा दाखल्यांचीच नोंदणी या सर्व्हरमध्ये होत आहे. त्यामुळे जुने दाखलेच अद्याप तयार नसताना बुधवारपासून हजारोच्या संख्येने दाखल्यांसाठी अर्ज सादर झाल्यास काय करायचे, असा प्रश्न केंद्रचालकांना पडला आहे. गेल्या महिन्यापासून यासंदर्भात केंद्रचालकांनी महाआॅनलाइनच्या जिल्हा समन्वयकापासून ते थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत याबाबत तक्रारी केल्या असल्या तरी त्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. असाच प्रकार राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये घडल्यानंतर तेथील जिल्हा प्रशासनाने सेतू केंद्रचालकांना त्यांच्या जुन्या सॉफ्टवेअरमध्ये काम करण्याची मुभा दिली होती. नाशिक जिल्हा प्रशासन मात्र यासंदर्भात सुस्त असून, येणाऱ्या काळात शासकीय दाखल्यांसाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्यावर काहीच कार्यवाही करण्यास तयार नसल्याची तक्रार केली जात आहे. बारावीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर दहावीचाही निकाल जाहीर होणार असून, काही शाखांमध्ये प्रवेशासाठी ३ जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना वेळेत दाखले देण्याची व्यवस्था करणे क्रमप्राप्त असून, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी सेतू व महा ई सेवा केंद्रचालकांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे गेल्या तीन आठवड्यांपासून दाखल्यांसाठी अर्ज सादर केलेल्या पालकांचा तगादा वाढला आहे.