नाल्यांची साफसफाई प्रशासनाचा दावा फोल
By Admin | Updated: May 30, 2014 01:06 IST2014-05-29T23:31:57+5:302014-05-30T01:06:53+5:30
पहिल्यच पावसात ठिकठिकाणी साचले पाणी

नाल्यांची साफसफाई प्रशासनाचा दावा फोल
पहिल्यच पावसात ठिकठिकाणी साचले पाणी
पंचवटी : महापालिकेने पावसाळयापुर्वी पंचवटीतील नालेसफाई केली असल्याचा दावा केला असला तरी हा दावा फोल ठरला आहे. पंचवटीतील काही भागात पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने नाल्यांची सफाई कागदावरच असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.
पंचवटीसह संपुर्ण शहरात सलग दोन दिवस पावसाने दमदारपणे हजेरी लावली होती. पावसाच्या पाण्यामुळे उतारमय भागातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. प्रशासनाने नाले सफाई केली असल्याचे नुकत्याच झालेल्या प्रभागाच्या बैठकीत लोकप्रतिनिधींना सांगितले मग पावसाचे पाणी रस्त्यावर साचले कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. पंचवटीतील प्रभाग क्रमांक १० व १२ ला जोडलेल्या गजानन चौकात काही दिवसांपुर्वीच जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले होते जलवाहिनी टाकल्यानंतर तेथिल खड्डे व्यवस्थितपणे बुजविणे गरजेचे होते मात्र त्या खोदकाम केलेल्य खड्डयात केवळ वरचेवर माती टाकल्याने ऐनवेळी आलेल्या पावसामुळे गाळाचे साम्राज्य तयार झाले होते. नाले तुडूंब भरल्याने पावसाचे पाणी नागरीकांच्या घरापर्यंत आल्याने नागरीकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी घरात येऊ नये म्हणून स्वत: नागरीकांनी चेंबरचे ढापे बाजूला सारून साचलेल्या पाण्याला वाट करून दिल्याचे चित्र सलग दोन दिवस झालेल्या पावसात दिसुन आले. (वार्ताहर)