सात दिवसांत नाशिकच्या अपर अधीक्षक नीलेश तांबे यांची नंदुरबारला बदली
By अझहर शेख | Updated: November 14, 2022 23:19 IST2022-11-14T23:18:54+5:302022-11-14T23:19:20+5:30
मागील आठवडभरापासून राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या गाजत आहे. बदल्या झाल्यानंतर पुन्हा मिळणारी स्थगिती व कार्यमुक्त न करण्याचे आदेश यामुळे याबाबत चर्चाही होऊ लागली आहे.

सात दिवसांत नाशिकच्या अपर अधीक्षक नीलेश तांबे यांची नंदुरबारला बदली
नाशिक : ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांची नाशिक पोलीस आयुक्तालयात उपआयुक्तपदी आठवडाभरापुर्वी गृह विभागाने बदली केली. त्यांच्या रिक्त पदावर रायगड जिल्ह्यातील महाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे यांची नियुक्ती करण्यात आली होती. सोमवारी (दि.१४) त्यांची नंदुरबारला बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त पदावर पदस्थापनेच्या प्रतीक्षेतील अनिकेत भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील आठवडभरापासून राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या गाजत आहे. बदल्या झाल्यानंतर पुन्हा मिळणारी स्थगिती व कार्यमुक्त न करण्याचे आदेश यामुळे याबाबत चर्चाही होऊ लागली आहे. नाशिकमध्ये राज्य गुप्त वार्ता विभागाच्या उपआयुक्त शर्मीष्ठा वालावलकर यांची बदलीचे आदेश गेल्या सोमवारी काढण्यात आले; मात्र पुन्हा २४ तासांत त्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये, असे आदेश येऊन धडकले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदाचा पदभार त्यांना स्वीकारता आला नाही. त्यानंतर आठवडाभरात नाशिक ग्रामिणचे अपर अधीक्षक नीलेश तांबे यांचे नव्याने बदलीचे आदेश काढण्यात आले. तांबे हे अधीक्षक कार्यालयात हजर झाले होते;मात्र मालेगाव अपर अधीक्षकपदाचा पदभार त्यांनी घेतलेला नव्हता. सोमवारी त्यांची नंदुबारला बदली करण्यात आली. भारती यांची अद्याप नियुक्ती झालेली नव्हती. ते पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते. त्यांची वर्णी नाशिकच्या मालेगाव अपर अधीक्षकपदी लागली आहे.