पंचवटी : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून वारंवार नियमाचे उल्लंघन होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून विशेष कारवाई मोहीम राबविली जाणार असून, जूनच्या दुसºया आठवड्यात शाळा सुरू होताच प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई केली जाणार असल्याचे संकेत कार्यालयाच्या वतीने देण्यात आले आहे.नाशिक शहरातील शेकडो रिक्षा व स्कूल बसचालक विविध शाळांतून विद्यार्थ्यांची ने-आण करतात. विद्यार्थी वाहतूक करताना अनेक रिक्षा व स्कूल बसचालक नियमांचे उल्लंघन करत असल्याने विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा बेशिस्त स्कूल बसचालकांना वठणीवर आणण्यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने शाळा सुरू होताच कारवाईचा दणका दिला जाणार आहे.वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे तसेच शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करणे गरजेचे असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कारवाई मोहीम राबवली जाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपपरिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी सांगितले.विद्यार्थी वाहतूक करताना क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविणे याशिवाय शालेय विद्यार्थी वाहतूक परवाना नसतानादेखील काही वाहनचालक विद्यार्थ्यांची वाहतूक करतात व उघडपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून येते.
शाळा सुरू झाल्यावर वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 01:51 IST