कारवाई : रेशन दुकानदारांकडे पैशांची मागणी करणारा पुरवठा अधीक्षक सेवेतून निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:40 IST2017-12-03T00:06:18+5:302017-12-03T00:40:08+5:30
शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक पुरवठा खात्याच्या संगणकाशी जोडण्याच्या कामासाठी रेशन दुकानदारांकडे पैशांची मागणी करणारा शहर धान्य वितरण कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक ए. डी. शेख याला सेवेतून निलंबित करण्याची कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला

कारवाई : रेशन दुकानदारांकडे पैशांची मागणी करणारा पुरवठा अधीक्षक सेवेतून निलंबित
नाशिक : शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक पुरवठा खात्याच्या संगणकाशी जोडण्याच्या कामासाठी रेशन दुकानदारांकडे पैशांची मागणी करणारा शहर धान्य वितरण कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक ए. डी. शेख याला सेवेतून निलंबित करण्याची कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, या कारवाईची चाहूल लागताच, शेख याने काही विशिष्ट समाजातील लोकांना एकत्र करून जिल्हाधिकाºयांवर कारवाई न करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न चालविला आहे. विशेष म्हणजे शेख याच्या भावालाही पुरवठा खात्याच्या अशाच एका कारणावरून अलीकडेच निलंबित करण्यात आले आहे.
शहर धान्य वितरण कार्यालयाच्या नाशिकरोड येथे हा प्रकार घडला आहे. काही रेशन दुकानदारांनी कार्यालयीन अधीक्षक ए. डी. शेख हा पैशांची मागणी करीत असल्याचे व पैसे मोजत असल्याचे चित्रीकरण करून ते फेसबुकवर व्हायरल केल्याने ‘लोकमत’मध्ये त्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याची दखल घेत पुरवठा खात्याने कारवाई सुरू केली आहे. शेख याने शिपाईपदापासून ते थेट कार्यालयीन अधीक्षकापर्यंत केलेली सेवा पुरवठा खात्यातच बजावली असून, त्याच्याकडेच नायब तहसीलदारपदाचा पदभारही सोपविण्यात आला आहे. यावरून त्याचा या खात्यावर असलेला दबदबा लक्षात यावा. शेख याचा भाऊ जे. डी. शेख हादेखील निफाड तालुक्यात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असून, गेल्या महिन्यात ग्रामस्थांनी रेशनचे काळाबाजारात जाणारे धान्य पकडून दिले असता, पोलिसांनी पुरवठा निरीक्षक जे. डी. शेख याला सदर धान्याबाबत पत्र दिले असता, त्याने सदरचे धान्य रेशनचे नसल्याचा परस्पर अहवाल देऊन टाकला. परिणामी पोलिसांनी धान्य सोडून दिले. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर प्रशासनाने चौकशी करून जे. डी. शेख याला सेवेतून निलंबित केले आहे. त्याचीच पुनरावृत्ती शहर धान्य वितरण कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक ए. डी. शेख याने केली आहे.
आकसापोटी खोटे आरोप केल्याचा दावा
काही विशिष्ट समाजातील व्यक्तींनी एकत्र येत जिल्हाधिकाºयांची भेट घेतली व ए. डी. शेख हा अल्पसंख्याक समाजाचा असल्यामुळे रेशन
दुकानदार आकसापोटी खोटे आरोप करीत असल्याचा दावा केला. परंतु जिल्हाधिकाºयांनी या शिष्टमंडळाला चांगलेच फैलावर घेतल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. या सर्व गोष्टींची प्रशासनाने गंभीर दखल घेत ए. डी. शेख याला निलंबित करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो स्वाक्षरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आला आहे.