एनबीटीच्या प्राचार्यांवर कारवाई पुणे विद्यापीठ : परीक्षेचे कोणतेही काम करण्यास मनाई
By Admin | Updated: May 9, 2014 23:58 IST2014-05-09T22:48:13+5:302014-05-09T23:58:34+5:30
नाशिक : न. ब. ठाकूर (एनबीटी) विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना वर्षभरासाठी कामकाज करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे विद्यापीठाच्या छाननी तालनीकरण विभागाकडून सदर कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत ही कारवाई केल्याचे समजते.

एनबीटीच्या प्राचार्यांवर कारवाई पुणे विद्यापीठ : परीक्षेचे कोणतेही काम करण्यास मनाई
नाशिक : न. ब. ठाकूर (एनबीटी) विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना वर्षभरासाठी कामकाज करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे विद्यापीठाच्या छाननी तालनीकरण विभागाकडून सदर कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत ही कारवाई केल्याचे समजते.
एलएलबी व बीएसएल शाखेच्या प्रात्यक्षिक गुणांवरून विद्यार्थ्यांना धमकावणे, त्यांचा मानसिक छळ करून त्यांना वेठीस धरणे अशा आशयाच्या तक्रारी काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या छाननी व तालनीकरण विभागाकडे केल्या होत्या. त्यावर निर्णय देताना विद्यापीठाने प्राचार्य डॉ. वैद्य यांच्यावर एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करीत एप्रिल २०१४ पासून एक वर्षासाठी विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षेचे काम करण्यास मनाई केली आहे. त्याचबरोबर याबाबतची नोंद सेवापुस्तकात करून तसे परीक्षा नियंत्रकांना कळवावे, असेही स्पष्ट केले आहे. याबाबतचे पत्र प्राप्त झाल्यानंतर डॉ. वैद्य यांनी परीक्षेचा संपूर्ण कार्यभार प्रा. कादरी यांना सोपविला आहे. दरम्यान, याच महाविद्यालयातील प्रा. सुनंदा काळे यांच्या विरोधात मानसिक छळ केल्याप्रकरणी एका विद्यार्थिनीने विद्यापीठाकडे तक्रार केल्याने महाविद्यालयातील कारभाराबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
विद्यापीठाकडे दाद मागणार
ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याविरोधात तक्रारी केल्या त्या विद्यार्थ्यांची वागणूक विद्यापीठाने पडताळून बघणे अपेक्षित होते. कारण त्यांनी केलेले आरोप हे पूर्णत: चुकीचे असून, त्याबाबत विद्यापीठाकडे दाद मागणार आहे. विद्यापीठाच्या कारवाईमुळे धक्काच बसला असून, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
- डॉ. अस्मिता वैद्य, प्राचार्य, न. ब. विधी महाविद्यालय
इतरांनी धडा घ्यावा
विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक गुणांवरून वेठीस धरणे हे पूर्णत: चुकीचे असून, या प्रकरणावरून अशी मानसिकता असलेल्या प्राध्यापकांनी धडा घेण्याची आवश्यकता आहे. ज्या विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे छळ केला जात असेल त्यांनी विद्यापीठाकडे तक्रार करावी.
- अजिंक्य गिते, तक्रारकर्ता