कृती समितीचा मोर्चा

By Admin | Updated: September 2, 2015 23:00 IST2015-09-02T22:59:06+5:302015-09-02T23:00:04+5:30

विविध संघटनांचा सहभाग : कामगार, कर्मचारी, शिक्षकांचे धरणे; तहसीलदारांना मागण्यांचे निवेदनसंयुक्त

Action Committee's Front | कृती समितीचा मोर्चा

कृती समितीचा मोर्चा

सिन्नर : कामगार कायद्यातील कामगारविरोधी व मालकधार्जिणे बदल रद्द करावे व अन्य मागण्यांसाठी येथे कामगार-कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सीटू संघटना, विडी कामगार, कारखाना कामगार, राज्य कर्मचारी, हिंद मजूर सभा,
घरेलू कामगार संघटना आदिंसह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या देशव्यापी संपानिमित्ताने कामगार-कर्मचारी संयुक्त संघटनेच्या वतीने येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सीटूचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ तांबे, कामगार-कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष हरिभाऊ तांबे, जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष अँड. वसुधा कराड, विडी कामगार नेत्या कमल बर्वे, उषा मुरकुटे, संतोष कुलकर्णी, विद्या गडाख, किरण गवळी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता येथील हुतात्मा स्मारकापासून मोर्चास प्रारंभ झाला. कामगार संघटनेचा जयघोष करीत व शासनाच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करीत मोर्चा बसस्थानक, गावठा, नवा पूल, गणेश पेठ, शिवाजी चौक, वावी वेस मार्गे तहसील कार्यालयात पोहचला.
यावेळी हरिभाऊ तांबे, अँड. वसुधा कराड, शिक्षक संघटनेचे एस. बी. देशमुख, दत्ता वायचळे यांनी मनोगत व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षांपासून संघटना विविध मागण्या सरकारपुढे मांडत आहे. सरकारने मागण्या मान्य करण्याऐवजी कामगारविरोधी धोरणे राबविण्यास प्रारंभ केला असल्याचा आरोप यावेळी वक्त्यांनी केला.
सरकारने कामगार कायद्यात कामगारविरोधी बदल करून कार्पोरेट्स व उद्योजक यांच्या फायद्यासाठी कामगारांचे बळी देण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. देशातील व राज्यातील कामगारविरोधी धोरणाचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला.
कामगारविरोधी कामगार कायद्यात बदल करा,  शेतकरीविरोधी भूमिअधिग्रहण वटहुकूम मागे घ्या, शेतकर्‍यांना पूर्ण कर्जमाफी करा, बंद उद्योग सुरू करा आदिंसह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना देण्यात आले. (वार्ताहर)

चांदवड : शिक्षक संघाच्या वतीने एकदिवसीय संप
चांदवड तालुका माध्यमिक शिक्षक संघ व समन्वय
समिती संलग्न महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, नाशिक जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या वतीने येथे संप पुकारण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात
आले.
निवेदनावर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डी. आर. बारगळ, कार्यवाह
एस. बी. ठोंबरे, के. डी. देवढे, एस. बी. देशमुख, हरिभाऊ ठाकरे, जिभाऊ
शिंदे, दिलीप पूरकर, ए. आर. सोनवणे, राजू नहार, डी. एन. ठाकरे, दिनेश
ठाकरे, एस. जी. ठाकरे, एस. टी. पवार, एस. एस. पवार, एल. एल. पवार, एस. बी. गांगुर्डे, एम. एस. देवरे, डी. बी. शेळके, एस. पी. बिडगर, देवरे, उघडे, जाधव, ठोके, बी. आर. गायकवाड, चव्हाण, एच. जी. कुंभार्डे, बी. व्ही. काळे, बी. सी. लोखंडे, सी. डब्ल्यू. न्याहारकर आदिंसह शिक्षकांच्या सह्या आहेत.

शिक्षकांच्या धरणे आंदोलनास तांबे यांचा पाठिंबा
सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, शिक्षक लोकशाही आघाडी यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी याठिकाणी येऊन शिक्षकांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात आपण शासनाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले.
अंशदायी पेन्शन योजना रद्द करून नियमित पी. एफ.ची खाती सुरू करावी, कामगार कायद्यात कामगारविरोधी तरतुदी करू नये, निवड श्रेणी विनाअट द्यावी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील बंदी त्वरित उठविण्यात यावी आदिंसह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना देण्यात आले. यावेळी एस. बी. देशमुख, पी. डी. विंचू, के. आर. काळे, एस. टी. पांगारकर, आर. बी. रणशेवरे, बी. एस. देशमुख, आर. जी. सातपुते, यू. बी. आव्हाड यांच्यासह तालुक्यातील शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
उपस्थित होते.
माकपाचा बोरगाव येथे रास्ता रोको
सुरगाणा : देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या समर्थनार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तालुक्यातील बोरगाव येथे वणी-सुरत महामार्गावर आमदार जे. पी. गावित यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर सुरगाणा शहरात शंभर टक्के बंद पाळण्यात आला.


विविध कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात सिन्नर तालुका ग्रामसेवक संघटना सहभागी झाली होती. कंत्राटी ग्रामसेवक वगळता ६२ ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी सहभागी झाले होते. संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय गिरी, सचिव प्रदीप काशिद, उपाध्यक्ष सुनील तुपे, जालिंदर वाडगे, संदीप देवरे, पी. के. सदगीर, ग्रामसेवक पतसंस्थचे संचालक बबन बिन्नर, विस्तार अधिकारी पी. एम. बिद्दे, कांतीलाल डुडवे, जयवंत साखरे, अनंत कोळी यांच्यासह ग्रामसेवक उपस्थित होते.

Web Title: Action Committee's Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.