बँक ऑफ महाराष्ट्र अपहार प्रकरणातील आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 01:41 IST2022-07-15T01:41:16+5:302022-07-15T01:41:47+5:30
देवळा / भऊर : देवळा तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत खातेदारांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस ...

महाराष्ट्र बँकेच्या अपहार प्रकरणातील अटक करण्यात आलेला संशयित भगवान आहेर. समवेत पोलीस अधीक्षक सचिन पाटील, पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे, नीलेश सावकार आदी.
देवळा / भऊर : देवळा तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत खातेदारांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस देवळा पोलिसांकडून अटक करण्यात आली. गुरुवारी दिवसभरात बँकेच्या शाखेत अनेक खातेदार व ठेवीदारांनी आपली खाते तपासणीसाठी रीघ लावली असता सदरची रक्कम यापेक्षा अधिक असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सदर बँकेकडून अद्याप किती रकमेचा अपहार झाला हे कळू शकले नाही. मात्र कालपर्यंत ३२ खातेदारांची १ कोटी ५० लाख ७३ हजार ४५० रुपयाच्या रकमेची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत देवळा पोलिसांत मालेगाव येथील बँकेचे क्षेत्रिय प्रबंधक श्रीराम भोर यांनी फिर्याद दिल्याने व खातेदाराची बँकेकडे रीघ लागल्याने पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ आरोपीचा शोध घ्यावा, अशी सूचना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलिसांनी भगवान ज्ञानदेव आहेर यास गुरुवारी (१४) रोजी दुपारी त्याचा शोध घेऊन सापळा रचून सोग्रस फाटा, ता. चांदवड येथून अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे व त्यांचे सहकारी नीलेश सावकार, पुरुषोत्तम शिरसाठ, ज्योती गोसावी आदींनी माहिती दिली.