एकवटलेले खातेप्रमुख तालुक्यांना पिटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:45 IST2017-07-19T00:45:16+5:302017-07-19T00:45:41+5:30
खातेप्रमुख खदखद प्रकरण : निमित्त संपर्क अभियानाचे

एकवटलेले खातेप्रमुख तालुक्यांना पिटाळले
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेत बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या विरोधात पदोपदी अपमानास्पद वागणूक देत असल्याचे कारण देत सर्व खातेप्रमुख एकत्र आल्याची चर्चा असतानाच, सर्व खातेप्रमुखांना पंधरा तालुक्यांमध्ये संपर्क अभियानाच्या निमित्ताने मंगळवारी (दि.१८) प्रशासनाच्या वतीने तातडीने पिटाळण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होती.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी आल्या आल्याच कर्मचारी व अधिकाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारला होता. इतकेच नव्हे तर आजी-माजी सदस्यांच्या चारचाकी वाहनांना जिल्हा परिषदेच्या आवारात बंदी घालत वाद ओढवून घेतला होता. लोकप्रतिनिधींमध्ये सीईओंबाबत नाराजी असतानाच सर्व खातेप्रमुखांमध्येही त्यांच्याबाबत हळूहळू नाराजी वाढल्याची चर्चा आहे.
काही वेळा बैठकांमधून थेट खातेप्रमुखांना अपमानास्पद वागणूक देणे, खातेप्रमुखांना स्वत:च त्यांच्या नस्त्या आणण्याचे आदेश व वेळेत नस्त्या न काढण्यासह आढावा बैठकांमधून वारंवार खातेप्रमुखांना निरुत्तर करणे, यांसह अन्य बाबींमुळे दुखावलेले खातेप्रमुख मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात दुखावल्याची चर्चा होती. त्यातच दोन दिवसापूर्वी मुख्य
कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वच खातेप्रमुखांची सेवापुस्तके त्यांच्या सरकारी निवासस्थानी नेल्याची चर्चा आहे. त्यामुळे दुखावलेले सर्व खातेप्रमुख एकत्र येऊन त्यांनी याबाबत थेट विभागीय आयुक्तांकडेच न्याय मागण्याची भूमिका घेतल्याचे कळते.
या एकूणच घडामोडींबाबत माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित होताच मंगळवारी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांमध्ये चलबिचल सुरू झाली.कामकाजाचा आढावा घेण्याचे आदेशखातेप्रमुख एकत्र येत असल्याचे चित्र असतानाच मंगळवारी सर्वच खातेप्रमुखांना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी नेमून दिलेल्या तालुक्यांमध्ये जाऊन संपर्क अधिकारी म्हणून तत्काळ कामकाजाचा आढावा घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच सर्व खातेप्रमुख त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यांमध्ये जाऊन पंचायत समितीत कामकाजाचा आढावा घेऊन सायंकाळी जिल्हा परिषदेत परतल्याचे चित्र होते.