शरणपूररोडवर अपघात; एक गंभीर, दोघे जखमीं
By Admin | Updated: July 10, 2014 00:57 IST2014-07-09T22:32:51+5:302014-07-10T00:57:31+5:30
शरणपूररोडवर अपघात; एक गंभीर, दोघे जखमीं

शरणपूररोडवर अपघात; एक गंभीर, दोघे जखमीं
नाशिक : सुसाट वेगाने धावणाऱ्या दुचाकी एकमेकांवर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, इतर दोघे जखमी झाले आहेत. सायंकाळी महापालिकेसमोरच हा अपघात घडला. अपघातग्रस्त तिघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कॅनडा कॉर्नरकडून पल्सर मोटारसायकलने येणारा दुचाकीस्वार आणि सीबीएसकडून कॅनडा कॉर्नरकडे निघालेला बुलेटस्वार एकमेकांवर समोरासमोर आदळले. या अपघातात बुलेटस्वार गंभीर जखमी झाला असून, पल्सर चालकही फरफटत गेल्याने त्याच्या पायासही गंभीर इजा झाली आहे. अपघातग्रस्त बुलेटस्वार हा अन्य एका दुचाकीवर आदळल्याने तोही जखमी झाला आहे.
अपघातानंतर प्रचंड आवाज झाल्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु अपघातग्रस्त युवकांची परिस्थिती पाहून त्यांना तत्काळ मदत करण्यास कुणीही पुढाकार घेत नसल्याने जखमींना लवकर उपचार मिळू शकले नाही. बराच वेळ तिघेही अपघातग्रस्त युवक रस्त्यातच पडून होते. सायंकाळच्या सुमारास प्रचंड वर्दळ असल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली; मात्र कुणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे येत
नव्हते.
काही वेळानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर उर्वरित दोघांना खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. दुचाकीस्वार सुसाट वेगाने गाडी चालवित असल्यामुळेच अपघात घडल्याची चर्चा सुुरू होती. गर्दीच्या वेळीही अनेक बाईकस्वार अशा प्रकारची स्टंटबाजी करीत असल्याच्या तक्रारी परिसरातील दुकानदारांनी पोलिसांकडे केल्या. (प्रतिनिधी)