जि.प.च्या ७० विद्यार्थ्यांचे अपघात अनुदान मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 20:06 IST2020-02-20T20:04:49+5:302020-02-20T20:06:16+5:30
प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेत असताना एखाद्या दुर्घटनेत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू वा अपंगत्व आल्यास अशा विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची योजना गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडून राबविली जात आहे.

जि.प.च्या ७० विद्यार्थ्यांचे अपघात अनुदान मंजूर
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : शालेय जीवनात दुर्घटना घडून मृत्यू वा अपंगत्व आल्यास विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याच्या राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या ७० विद्यार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात आली असून, त्यापोटी वाटप करावयाचा ५० लाख ८५ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे. लवकरच सदरची रक्कम विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या बॅँक खात्यावर जमा केली जाणार आहे.
प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेत असताना एखाद्या दुर्घटनेत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू वा अपंगत्व आल्यास अशा विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची योजना गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडून राबविली जात आहे. त्यात प्रामुख्याने रस्ता अपघात, वीज अंगावर पडणे, शॉक लागणे, सर्पदंश होणे, हिंस्त्र प्राण्याने हल्ला करणे, नैसर्गिक आपत्तीत पाण्यात बुडणे, पुरात वाहून जाण्याच्या घटनांचा समावेश करण्यात आला आहे. शाळांच्या पातळीवरून अशा प्रकारचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करून नंतर त्याला मान्यता दिली जाते. गेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात जवळपास ८० विद्यार्थ्यांना अशा घटनांना सामोरे जावे लागले आहे. त्यात प्राथमिक शिक्षण कार्यालयाकडून ५७ व माध्यमिक शिक्षण कार्यालयाकडील २३ प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. यासंदर्भात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्हास्तरीय समितीची बैठक होऊन त्यात प्राथमिक विभागाचे ४२ व माध्यमिक विभागाचे २८ अशा प्रकारे ७० प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत विद्यार्थ्याच्या शारीरिक हानीवर आर्थिक मदत देण्याची तरतूद असून, त्यात कमीत कमी ३० हजार ते एक लाखापर्यंत अनुदान विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना दिली जाते. त्यामुळे या ७० विद्यार्थ्यांसाठी ५० लाख ८५ हजार रुपयांचे अनुदान अलीकडेच मंजूर करण्यात आले असून, सदरचा निधी शिक्षणाधिकाºयांच्या नावे वर्ग करण्यात आला आहे. सदरचा निधी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.