दुचाकीस्वाराच्या हुलकावणीमुळे बसला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 23:14 IST2021-10-09T23:13:19+5:302021-10-09T23:14:10+5:30
सुरगाणा : बसला हुलकावणी देणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात मानव विकास संशोधन स्कूल बसला अलंगुणजवळील बोरीपाडा येथील वळणावर किरकोळ अपघात झाला होता. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच गाडीवर नियंत्रण मिळविल्याने बसमधील विद्यार्थ्यांचे प्राण वाजले.

सुरगाणा तालुक्यातील अलंगुण जवळील बोरीपाडा येथे मानव संसाधन विकास बसला झालेल्या अपघातानंतर संकटकालीन दरवाजातून उड्या मारताना विद्यार्थी.
सुरगाणा : बसला हुलकावणी देणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात मानव विकास संशोधन स्कूल बसला अलंगुणजवळील बोरीपाडा येथील वळणावर किरकोळ अपघात झाला होता. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच गाडीवर नियंत्रण मिळविल्याने बसमधील विद्यार्थ्यांचे प्राण वाजले.
शनिवारी (दि.९) दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान अलंगुण येथील महाविद्यालय सुटल्यावर हातरुंडी, उंबरदे, पळसन, पळशेत, आमदा, वांगण या भागातील विद्यार्थी मानव संसाधन विकास कळवण आगाराची बसने (एम एच ०७ सी ९५१४) घरी परतत असताना वळणावर अचानक हातरुंडीच्या दिशेने वेगात दुचाकीस्वार समोर आल्यावर त्याला वाचवण्याच्या नादात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या भूमिगत केबलच्या चारीत टायर फसल्याने बस पुढे न जाता जागीच थांबली. बस थांबताच विद्यार्थ्यांनी संकटकालीन दरवाजातून उड्या मारल्या. सर्व विद्यार्थी सुखरूप असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी टळली.
रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाचा आधार मिळाल्याने बस पलटी होण्यापासून वाचली त्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांना काहीही दुखापत झाली नाही. चारीत टायर्स फसले नसते तर पुढे असलेल्या नदीवरील सिमेंट प्लग साठवण बंधाऱ्यात अथवा भाताच्या खाचरातून नदीत जाऊन पडली असती. बसमध्ये ३५ ते ४० शालेय विद्यार्थी प्रवास करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शी हातरुंडी येथील राजू पवार यांनी सांगितले.
दुचाकी स्वाराने घटना पाहताच जागेवरून पळ काढला. त्यामुळे पुन्हा एकदा विनापरवाना बेफामपणे दुचाकी चालविणाऱ्या तरुणांचा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वेगात दुचाकी चालकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.
घटना समजताच पंचायत समितीचे सभापती इंद्रजित गावीत, राहुल गावीत, वसंत बागुल यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत विद्यार्थ्यांना बसमधून सुखरूप उतरविण्यास मदत केली व धीर दिला. विद्यार्थी सुखरूप पाहून वाहक तसेच चालकांना पालकांनी धन्यवाद देत आभार मानले.