सिडको : धुळे येथून नाशिकला आलेल्या एका संशयित गुन्हेगाराचे अंबड परिसरातून अपहरण झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अपहरण करणाऱ्या संशयितांच्या मागावर आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे येथील रशीद शब्बीर शेख हा त्याच्या मैत्रिणीसह नाशिकला आला होता. सोमवारी (दि. ४) त्याने त्याच्या मैत्रिणीला केवलपार्क येथे मावशीकडे सोडले. त्यानंतर तो एक्सलो पॉर्इंट येथील एका ज्युस सेंटरमध्ये मित्रांसोबत गप्पा मारत होता. यावेळी एका चारचाकीतून गाडीतून आलेल्या चौघांनी त्याला गाडीत बसविले. त्यानंतर गाडी मुंबईच्या दिशेकडे रवाना झाली. याप्रकरणी संजय महादू साळुंखे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, शेख हा कर्नाटक येथील बँक दरोड्यातील मुख्य आरोपी असून, तो दीड महिन्यांपूर्वीच सुटला आहे. तसेच त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे करीत आहे.
अंबडमधून संशयित गुन्हेगाराचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 01:20 IST