संजय शहाणे
नाशिक : पाथर्डी फाट्याकडून देवळाली कॅम्पकडे दुचाकीवरून मंगळवारी (दि. १४) सोनू किसन धोत्रे हा युवक जात असताना पाथर्डी सर्कललगत रस्त्यावर मांजाने गळा कापला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात युवकांच्या गळा चिरण्याच्या घटना घडत आहेत. आठवडाभरात वडाळारोड भागात दोन दुचाकीस्वार नायलॉन मांजाने गळा कापला गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत. एका युवकाच्या गळ्यावर ७५ टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. मकर संक्रांतच्या दिवशी सोनू धोत्रे (२३, रा. चारणवाडी,देवळाली कॅम्प) मंगळवार सकाळी साडेबारा वाजता पाथर्डी फाट्याकडून देवळाली कॅम्प कडे दुचाकीने जात होता. त्यावेळी पाथर्डी सर्कल लगत हवेतून वेगाने आलेल्या नायलॉन मांजाने त्याचा गळा चिरला गेला. त्यात त्याच्या गळ्याभोवती खोल गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
गुजरात येथे नगरपालिकेत कंत्राटी वाहचालक म्हणून सोनू नोकरी करत होता. त्याचा मे महिन्यात विवाह होणार होता. सोनू गुजरात येथून स्वतःच्या दुचाकीने संक्रांतीनिमित्त त्याच्या आईला व होणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी नाशिकला येत असताना ही दुर्घटना घडली. तो कुटुंबाला भेटण्यापूर्वी मृत्यमुखी पडला. चारणवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण सोनार, पवन परदेशी, कुलदीप पवार, अमोल कोथमीरे, जय लाल राठोड आदींनी त्यास रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात हळविले. त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.