गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नाशिकमध्ये आठ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात
By अझहर शेख | Updated: August 31, 2022 15:10 IST2022-08-31T15:10:10+5:302022-08-31T15:10:32+5:30
कोरोनाच्या दोन वर्षानंतर धुमधडाक्यात सर्वत्र हर्षोल्हासात गणेशोत्सव साजरा होत आहे.

गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नाशिकमध्ये आठ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात
नाशिक :
कोरोनाच्या दोन वर्षानंतर धुमधडाक्यात सर्वत्र हर्षोल्हासात गणेशोत्सव साजरा होत आहे. यंदा गणेशभक्तांचा उत्साह द्विगुणित झाला असून या पार्श्वभुमीवर या सार्वजनिक उत्सवात कोणतेही ‘विघ्न’ येऊ नये, यासाठी नाशिक शहर व ग्रामिण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. बंदोबस्ताचे चोख नियोजन करण्यात आले असून राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्यादेखील त्यासाठी दिमतीला घेतल्या गेल्या आहेत. सुमारे चार हजार पोलिसांचा फौजफाटा गणेशोत्सवासाठी तैनात करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून ढवळून निघालेले राजकिय वातावरण, राज्याच्या गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेले अलर्ट, सण उत्सवांमध्ये होणारी गर्दी यामुळे पोलीस प्रशासन अधिकाधिक सतर्क झाले आहे. कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्था शहर आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत धोक्यात येणार नाही, यासाठी पुर्णपणे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव दल (एसआरपीएफ) दंगल नियंत्रण पथक, दहशतवादविरोधी पथक, राखीव पोलीस, जलद प्रतिसाद पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहे. गणेश विसर्जनाच्या शहरातील व नाशिकरोडमधील मुख्य मिरवणूकांच्या मार्गांचीही पोलिसांकडून पाहणी पुर्ण करण्यात आली आहे. तसेच या मार्गावर असलेले सर्व धार्मिक स्थळेही विचारात घेण्यात आले आहेत. यानुसार पोलिसांकडून या ठिकाणी ‘फिक्स पॉइंट’ बंदोबस्ताची आखणी केल्याचे सुत्रांनी सांगितले.