नाशकात रस्ता ओलांडताना कल्याणचा प्रवासी ठार; घटनेची इंदिरानगर पोलिस ठाण्यात नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 13:38 IST2023-05-18T13:38:17+5:302023-05-18T13:38:38+5:30
या आपघातात पादचारी ठार झाला असून या घटनेची इंदिरानगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नाशकात रस्ता ओलांडताना कल्याणचा प्रवासी ठार; घटनेची इंदिरानगर पोलिस ठाण्यात नोंद
संजय शहाणे
नाशिक : शहरातील नातेवाईकांकडे जाणाऱ्या मुबईतील कल्याण वेस्ट भागातील एका पादचारी व्यक्तीला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक लगतच्या समांतर रस्त्यावर ओलांडत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी ठार झाला असून या घटनेची इंदिरानगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण वेस्ट भागातील आधारवाडी येथील विकास भाईदास पाटील गुरुवारी (दि.१८) मुंबईहून नाशिकला त्यांच्या खासगी कामासाठी आले होते. ते मुंबईहून येणाऱ्या वाहनातून मुंबई आग्रा माहामार्गावर मध्यरात्री पावणे एक वाजेच्या सुमारास हॉटेल सूर्यासमोरील भागात उतरले. त्यानंतर ते इंदिरानगर येथील त्यांच्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी मुंबई महामार्गाच्या लोखंडी ग्रीलच्या तुटलेल्या जागेतून बाहेर येऊन समांतर रस्ता ओलांडत असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
या अपघातात पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना तत्काळ औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र. डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या प्रकरणीत इंदिरानगर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.