शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:53 IST2025-08-06T12:51:47+5:302025-08-06T12:53:00+5:30
श्रेयाचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील देशवंडी असून तेथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रेया हीच घरात मोठी असून तिला लहान बहीण आहे.

शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
नाशिक - जेलरोड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीचा मंगळवारी शाळेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. गंधर्व नगरीतील श्रेया किरण कापडी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. जेलरोड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ती शिक्षण घेत होती.
मंगळवारी सकाळी शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करतानाच तिला अचानक चक्कर आली आणि ती मैदानावर कोसळली. ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच तिला त्वरित एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. श्रेयाचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील देशवंडी असून तेथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रेया हीच घरात मोठी असून तिला लहान बहीण आहे.
अलीकडेच पुण्यात एका २७ वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील राजपूर येथे अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला सुभाष दाते हा तरुण जम्मू काश्मीर भारतीय सैन्य दलात कार्यरत होता. गेले दोन वर्षापासून दाते जम्मू-काश्मीर येथे बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन बी आर ओ मधील ड्राइंग एस्टेब्लिशमेंट सुपरवाइझर (डी.ई.एस.)ह्या पदावर कार्यरत होता. मात्र पुढील परीक्षेचे पेपर द्यायचे असल्याने सुभाष पाच दिवसांची रजा घेऊन गावी परतले होता. बुधवारी ३० तारखेला सुभाष हे झोपेतून उठले असता त्यांच्या छातीत अचानक दुखण्यास सुरू झाले. तात्काळ तळेघर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी घोडेगाव येथे पाठवले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, राजस्थानच्या सीकरमध्ये काही दिवसांआधी अशीच घटना बघायला मिळाली. इथे एका ९ वर्षाच्या मुलीने हार्ट अॅटॅकमुळे जीव गमावला. ही घटना शाळेत लंच ब्रेकदरम्यान घडली होती. प्राची कुमावत लंच बॉक्स उघडताच अचानक बेशुदध पडली. शिक्षक तिला लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेले. नंतर तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं. पण तिथे पोहोचण्याआधीच तिचा जीव गेला होता.