Malegaon Accident ( Marathi News ) : बसचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडल्याने कंक्राळे येथील १६ उघडल्याने वर्षीय विद्यार्थिनी बसमधून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील करजंगव्हाण येथील विद्यार्थिनी जयश्री कन्नोर ही शाळेत बसने जात होती. गर्दी असल्याने ती बसच्या मागील बाजूस असलेल्या आपत्कालीन दरवाजाजवळ उभी होती. गर्दीमुळे अचानक दरवाजा उघडल्याने दरवाजातून थेट बाहेर जमिनीवर पडल्याने गतप्राण झाली. याप्रकरणी केदा कन्नोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडनेर-खाकुर्डी पोलिसांनी बस चालक व वाहक प्रशांत चव्हाण व नितीन शेवाळे यांच्याविरुद्ध जयश्रीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.
बसमधून खाली पडलेल्या जयश्रीच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिला त्वरित ग्रामस्थांनी तातडीने मालेगावी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती ती मृत झाली असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक मनीषा देवरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जयश्रीच्या नातेवाइकांना एसटीतर्फे तात्पुरती काही आर्थिक मदत केली. अपघाताचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक एच. डी. चव्हाण हे करीत आहे.
पण उशीर झाला..
तालुक्यातील कंक्राळे येथील जयश्री ही विद्यार्थिनी करजंगव्हाण गावातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकत होती. दररोजच्या प्रमाणे शाळेत जाण्यासाठी जयश्री व काही विद्यार्थी मालेगाव आगाराच्या गरबड गावा मार्गे आलेल्या बसमध्ये चढले. बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती यामुळे जयश्री बसच्या मागील बाजूस असलेल्या आपत्कालीन दरवाजाजवळ उभी राहिली व काही अंतरावरच आपत्कालीन दरवाजा कंक्राळे गावा नजीकच अंतरावर अचानक आपोआप उघडला. जयश्री दरवाजामधून पाठीमागे रस्त्यावर पडली. ही बाब निदर्शनास येताच बसमधील प्रवासी व विद्यार्थ्यांनी आरडाओरड करून बस थांबवली पण तोवर उशीर झाला होता.