जिल्ह्यात अभियांत्रिकी पदविकेसाठी ९ हजार २५४ जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:18 IST2021-06-09T04:18:23+5:302021-06-09T04:18:23+5:30
नाशिक : दहावीनंतरचे अभियांत्रिकी डिप्लोमा प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच होणार असल्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केेले आहे. त्यामुळे ...

जिल्ह्यात अभियांत्रिकी पदविकेसाठी ९ हजार २५४ जागा
नाशिक : दहावीनंतरचे अभियांत्रिकी डिप्लोमा प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच होणार असल्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केेले आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासोबतच डिप्लोमा प्रवेशाविषयी विद्यार्थी व पालकांकडून चौकशी सुरू झाली. जिल्ह्यात डिप्लोमाच्या उपलब्ध ९ हजार २५४ जागांच्या तुलनेत प्रवेशाचे प्रमाण कमी असल्याने डिप्लोमा प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळणे शक्य होणार आहे. दरम्यान, मागील वर्षी केवळ ५ हजार १७८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. तर ५४ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या.
कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे काय होणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर निर्माण झाला होता. अखेर तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जुलैमध्ये सीईटी घेऊन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीईटीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट करीत त्यानुसारच पुढील प्रवेश प्रक्रिया होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया या दहावीच्या गुणांनुसारच राबविल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील २५ तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी पदविकेच्या ९ हजार २५४ जागा उपलब्ध आहे. गतवर्षी यापैकी केवळ ५ हजार १७८ जांगावर म्हणजे ५६ टक्के प्रवेश झाले होते. तर उर्वरित ५ हजार ७६ जागांवर (५४ टक्के) प्रवेश होऊ शकले नाही. त्यामुळे उपलब्ध जागांच्या प्रमाणात यावर्षी काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता व्यक्त होत नाही. ज्या संस्थांमध्ये सलग दोन ते तीन वर्ष प्रवेश होऊ न शकलेल्या विद्याशाखा बंद होण्याची शक्यता असली तरी काही नवीन संस्थांमध्ये जागा वाढणार असल्याने ही कमी भरून निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
---
गतवर्षी जिल्ह्यात असे झाले प्रवेश
तंत्रनिकेतन महाविद्यालये- २५
उपलब्ध जागा - ९,२५४
प्रवेशित विद्यार्थी ५,१७८
रिक्त जागा- ४,०७६
---
विभागातील जिल्हानिहाय जागा
जिल्हा संस्था जागा
नाशिक - २५ - ९,२५४
धुळे - १० - २,७३७
जळगाव - १६ - ३,९५७
नंदुरबार -०३ - ७८८
अहमदनगर - २७ - ७,७६३