मालेगावातील ८० हजार शेतकऱ्यांनी पीकविम्याकडे फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST2021-08-28T04:19:16+5:302021-08-28T04:19:16+5:30
मालेगाव : प्रधानमंत्री पीकविमा योजनेचे जटिल नियम, विमा कंपन्यांचा नियोजनशून्य कारभार, पीकविमा परताव्यासाठी शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक म्हणून तालुक्यातील १ ...

मालेगावातील ८० हजार शेतकऱ्यांनी पीकविम्याकडे फिरवली पाठ
मालेगाव : प्रधानमंत्री पीकविमा योजनेचे जटिल नियम, विमा कंपन्यांचा नियोजनशून्य कारभार, पीकविमा परताव्यासाठी शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक म्हणून तालुक्यातील १ लाख १६ हजार ९६० खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ ३६ हजार ९९८ शेतकऱ्यांनीच पीकविमा काढला आहे. तब्बल ७९ हजार ९६२ खातेदार शेतकऱ्यांनी पीकविम्याकडे पाठ फिरवली आहे. विमा कंपन्या स्वत:चेच उखळ पांढरे करीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
मालेगाव तालुक्यात १४४ गावे आहेत. या गावांमध्ये कोरडवाहू व बागायत क्षेत्र आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १ लाख ८३ हजार २१२ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी तालुक्यात १ लाख १८ हजार ७९० हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे, तर फळ पिकाखाली १० हजार ५१० हेक्टर क्षेत्र, सर्वसाधारण भाजीपाला क्षेत्र १३ हजार ५१२ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा कृषी विभागाने ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. तालुक्यात शंभर टक्के खरीप पेरणी झाली आहे. नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे तसेच प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात झालेली घट भरून निघावी, प्रतिकूल हवामान घटकामुळे सर्वसाधारण क्षेत्रात पेरणी व लावणी न होणे, प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान म्हणजेच काढणीच्या १५ दिवसआधीच पावसाने मारलेली दडी, दुष्काळ, पूरस्थिती यामुळे अपेक्षित सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्के घट असेल तर तसेच पीकपेरणी ते काढणीपर्यंतच्या पिकांच्या उत्पादनात कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव व नैसर्गिक आपत्ती, भूकंप, वीज कोसळणे, वादळ, गारपीठ, चक्रीवादळ, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, पीक काढणीनंतर १४ दिवसांच्या आत शेती उत्पादनाचे नुकसान झाले तर पीकविमा घेतलेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ दिला जातो. यासाठी शासनाने प्रतिहेक्टरसाठी पीकनिहाय दर निश्चित केले आहेत; मात्र गेल्या काही वर्षांपासून विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वेळेवर पीकविम्याची रक्कम अदा केली जात नाही. परिणामी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे पाठ फिरवली आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात सर्वाधिक पीकविम्याचा लाभ मालेगाव तालुक्याने घेतला होता. यंदा प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा ५ हजार ८३७ कापूस उत्पादक, २४ हजार ८७८ मका उत्पादक, १ हजार ९२ बाजरी उत्पादक, १५१ तूर उत्पादक, ४ हजार ५३० कांदा उत्पादक, ३०० भुईमूग, ११६ मूग व ९४ ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व पीकविमा योजनेची माहिती मिळावी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीजवळच विमा कंपनीचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. सध्या कृषी विभागाकडून खरीप हंगामातील पिकांची टप्प्याटप्प्याने सर्व्हे करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्रतिक्रिया :
मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांसाठी पीकविमा तातडीने काढून घ्यावा. पीकविमा योजनेत सहभाग होण्यासाठी काही अडचण असेल तर संबंधित कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. पिकांचे नुकसान झाले असेल तर पंचनामे करून कंपनीला ७२ तासांच्या आत सूचनापत्र देऊन पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा.
- बाळासाहेब व्यवहारे, तालुका कृषी अधिकारी, मालेगाव