निकालापूर्वी आत्महत्या करणाऱ्या कौस्तुभला ६९ टक्के
By Admin | Updated: June 13, 2017 23:32 IST2017-06-13T23:32:20+5:302017-06-13T23:32:40+5:30
निकालापूर्वी आत्महत्या करणाऱ्या कौस्तुभला ६९ टक्के

निकालापूर्वी आत्महत्या करणाऱ्या कौस्तुभला ६९ टक्के
सिडको : येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्याने निकालाच्या धास्तीने एक दिवस आधीच घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली असली तरी, आज प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर तो शेकडा ६९ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. सिडकोतील कौस्तुभ मुणगेकर हा मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत बसला होता. त्याने तिडके कॉलनीतील
सेंट फ्रान्सिस शाळेतून इयत्ता दहावीची परीक्षा दिली. मात्र परीक्षेत आपण नापास होईल या धास्तीने या विद्यार्थ्याने निकालाच्या एक दिवस आधीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाच्या वेगवेगळ्या तारखा दिल्या जात होत्या़ त्यातच रविवारी दिवसभर ‘सोमवारी दहावीचा निकाल’ असे संदेश फिरत असल्याने परीक्षेत आपण पास होणार की नापास याची भीती कौस्तुभला होती़ रविवारी (दि.११) रात्री उशिरापर्यंत आई-वडिलांसोबत त्याने गप्पा मारल्या़ रात्री सर्वजण झोपले असता पहाटेच्या सुमारास त्याने घरातील हॉलमध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील कालिदास हे सकाळी उठले असता त्यांना कौस्तुभने आत्महत्या केल्याचे दिसले़ मयत कौस्तुभचा अंत्यविधी करून मुणगेकर कुटुंबीय मुंबई येथे त्यांच्या नातेवाइकांकडे गेले असून, आज कौस्तुभचा दहावीचा निकाल लागला. कौस्तुभ शेकडा ६९ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे.