६२ टक्के बालकांचे सर्वेक्षण पूर्ण : महिला, बालकल्याण समिती बैठक
By Admin | Updated: July 18, 2015 00:24 IST2015-07-18T00:23:58+5:302015-07-18T00:24:28+5:30
आरोग्य तपासणीसाठी ७५ पथकांची निर्मिती

६२ टक्के बालकांचे सर्वेक्षण पूर्ण : महिला, बालकल्याण समिती बैठक
नाशिक : राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून, त्यानुसार बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी ७५ पथकांची निर्मिती करण्यात आली असून, या पथकाद्वारे ६२ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा समन्वयकांनी महिला व बालकल्याण समितीच्या मासिक बैठकीत दिली.
समितीची मासिक बैठक सभापती शोभा सुरेश डोखळे यांच्या उपस्थितीत झाली. त्यात अतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात बालकांच्या सुरू असलेल्या विविध आजारांच्या आरोग्य तपासणीची माहिती दिली. त्यात बालकाच्या जन्मापासून वयाच्या दहा महिन्यांपर्यंत नऊ विविध प्रकारचे लसीकरण व आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी सुकन्या योजनेचा आढावा दिला. मुलींच्या जन्माची माहिती व सर्वेक्षण करून तसा अहवाल प्रकल्प कार्यालयास सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगून १ ते ७ आॅगस्ट दरम्यान जिल्ह्यात स्तनपान सप्ताह राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सेवासमाप्तीनंतरचा लाभ देण्याबाबत आढावा घेतला असता मालेगाव प्रकल्पातील चार प्रकरणे मंजूर झालेली असून उर्वरित प्रकल्प कार्यालयांनी लाभ देण्याबाबतचे प्रस्ताव त्वरित तयार करण्याच्या सूचना यावेळी सभापती शोभा डोखळे यांनी दिल्या.
बैठकीस सदस्य सुनिता अहेर, कलावती चव्हाण, सुरेखा
जिरे, शीला गवारे, सुरेखा गोधडे, सीमा बस्ते, सोनाली पवार,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्वव खंदारे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)